पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 घरोघरी’ चा शुभारंभ
सोलापूर : शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 घरोघरी’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ आज बुधवारी विद्यापीठात प्रभारी कुलगुरू राजनीश कामत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सचिन गायकवाड, इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा आदी उपस्थित होते. विद्यापीठातील उद्यम इनक्युबेशन केंद्रातर्फे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 जनजागरण दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. कामत म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण तिसऱ्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त विद्यापीठ राबवत असलेल्या विविध योजनांचा हा कार्यक्रम असून विद्यार्थ्यांबरोबरच सामान्य नागरिक देखील याचा फायदा घेऊ शकतात, असे सांगितले. शहर व जिल्ह्यात ही दिंडी सर्वत्र जाईल. घरोघरी नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रसार यानिमित्ताने होईल, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. कांबळे यांनी विद्यापीठ आणि इनक्युबेशन सेंटरकडून हा कार्यक्रम संपूर्ण ताकतीने राबविण्यात येईल, अशी माहिती दिली. कुलसचिव योगिनी घारे यांनी या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले.
इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी जाणार आहे. या दिंडीचा लाभ घेण्यासाठी व माहितीकरिता ७०८०२०२०५५ आणि ७०८०२०२०५६ या दोन हेल्पलाईन नंबर विद्यापीठाने जारी केल्या आहेत. या दिंडीसाठी श्रीनिवास पाटील आणि श्रीनिवास नलगेशी हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.