अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची २०२४-२५ पुणे महानगर कार्यकारणी घोषित
पुणे : २५ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगराची २०२४-२५ साठीची कार्यकारिणी घोषणा गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तांत्रिक अभियांत्रिकी विद्यापीठ पुणे (COEP) चे कुलगुरू प्रा डॉ सुनिल भिरुड, प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थी परिषदेचे पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय संघटनमंत्री देवदत्त जोशी, पुणे महानगर अध्यक्ष प्रा डॉ प्रगती ठाकूर, महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे हे उपस्थित होते. प्रा प्रगती ठाकूर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हर्षवर्धन हरपुडे यांनी मंत्रिप्रतिवेदन केले. ज्यात मागील वर्ष २०२३-२४ मधील कार्यक्रम, उपक्रम व आंदोलने याबाबत त्यांनी विस्तृत मांडणी केली. त्यांनी विद्यापीठातील ललित केंद्रात, प्रभू श्रीराम यांची झालेली विटंबना व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त पुण्यात झालेल्या ‘Vivekanand Run’ मॅराथॉन चा विशेष उल्लेख केला.







कुलगुरू प्रा डॉ सुनिल भिरुड यांनी त्यांच्या मनोगतात, ‘विद्यार्थी परिषद गेली ७६ वर्षे काम करत आहे, हे कौतुकास्पद आहे. समस्यांवर काम करत असतानाच निसर्गातील अवेळी होणारे बदल आणि त्याचा पडणारा परिणाम या विषयातही विद्यार्थी परिषदेने काम करावे.’ अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
देवदत्त जोशी यांनी त्यांच्या भाषणात, ‘आणीबाणीच्या काळात देशातील सर्वात पहिले विद्यार्थी आंदोलन हे स प महाविद्यालयात झाले आणि तेथूनच ही चळवळ पुढे गेली. अशाच पद्धतीने पुणे शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम करत आहे. बाहेरून पुण्यात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या शोधून त्यांचे निराकरण विद्यार्थी परिषद अग्रेसररित्या करत आहे.’ असे भाष्य केले.
यावेळी महानगर सहमंत्री म्हणून आरोह कुलकर्णी, शंतनु ढमढेरे, सई थोपटे, भूमिका कानडे, प्रथमेश जगदाळे यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली. प्रचंड पाऊस असूनही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.