पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे शहराला जागतिक ओळख : एमआयटी डब्ल्यूपीयूतील संवाद

विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. १३ जानेवारी :
पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे पुण्याचे नाव पर्यटनाच्या जागतिक नकाशावर अधोरेखित होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे, तसेच पुण्याला क्रीडा शहर म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

पुणे जिल्हा प्रशासन आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

Pune Grand Challenge Tour gives the city global recognition: A discussion at MIT WPU.
Pune Grand Challenge Tour gives the city global recognition: A discussion at MIT WPU.

यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, स्टुडंट अफेअर्सचे डीन डॉ. हितेश जोशी, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. वैभव वाघ आणि सहयोगी संचालक मंगेश लटपटे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, या स्पर्धेसाठी ६ महिन्यांच्या कालावधीत जागतिक दर्जाचे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी ४३७ किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा सायकल मार्ग तयार केला जाणार असून, ३० देशांतील १७० आंतरराष्ट्रीय सायकलस्वार या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

विद्यार्थ्यांनी नियोजन व अंमलबजावणीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की, यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.

या सायकल स्पर्धेमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात पर्यटन, गुंतवणूक व रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. संपूर्ण स्पर्धा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली होणार असून पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांचे नियंत्रण राहणार आहे. या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने शेकडो किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक उभारण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

१९ ते २३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पुणे ग्रँड टूरमुळे किल्ले, गड, धरणे, नद्या, डोंगररांगा, जैवविविधता, संस्कृती तसेच ऐतिहासिक व धार्मिक स्थळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध होतील, असेही डुडी यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला ४०० विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर हजारो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला.
स्वागत भाषण डॉ. वैभव वाघ यांनी केले, तर आभार मंगेश लटपटे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com