डॉ ए एम गुरव व डॉ आर एस साळुंखे लिखित पुस्तकाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन
निरंतर शाश्वत विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली आणि भारतीय व्यवसाय प्रणाली वैज्ञानिक दृष्टीने अभ्यासणे काळाची गरज – कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के
कोल्हापूर : डॉ ए एम गुरव व डॉ आर एस साळुंखे लिखित भारतीय ज्ञान प्रणाली आणि भारतीय व्यवसाय प्रणाली (Indian Knowledge System and Indian Business System) या पुस्तकाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन झाले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यासक्रमातील बदलानुसार अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणाली आणि भारतीय व्यवसाय प्रणाली अभ्यासण्यासाठी २ क्रेडीटचा कोर्स असून, त्या अनुषंगाने हे पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान प्रणालीच्या संकल्पना आणि उपयोजनांचा परिचय करून देते.
वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील विभागप्रमुख, प्रा डॉ ए एम गुरव व कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस येथील प्राचार्य प्रा डॉ आर एस साळुंखे यांचे लिखित पुस्तक हे दोन भागात विभागले असून पहिल्या भागात भारतीय व्यवस्थापनाची उत्क्रांती, भारतीय व्यवस्थापनाच्या प्रमुख कल्पना, व्यवस्थापनातील मूल्यांची भूमिका, भारतीय महाकाव्ये आणि व्यवस्थापन, वैदिक व्यवस्थापनाची परिमाणे, भगवद्गीता आणि व्यवस्थापन, रामायण आणि व्यवस्थापन, बुद्धाचे व्यवस्थापन, कौटिल्याचे अर्थशास्त्र (चाणक्याचे व्यवस्थापनाचे सिद्धांत) याचे तपशीलवार विवेचन केले आहे, तसेच दुसऱ्या भागात भारतीय व्यवसाय मॉडेल यामध्ये लेखकानी नामांकित उद्योगसमूहाचे उद्योग मॉडेल जसे टाटा, बजाज, आदित्य बिर्ला, रिलायन्स इंडस्ट्रीज, AMUL चे बिझनेस मॉडेल याचे विशलेषण केले आहे.
याप्रसंगी विद्यापीठाचे प्र – कुलगुरू प्रा डॉ पी एस पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रा डॉ पी एस पाटील यांनी देशाच्या विकासासाठी GER कसा महत्वाचा आहे. त्याचबरोबर डॉ के कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशी व डॉ माशेलकर यांच्या अध्येक्षतेखाली गठित टास्क फोर्स समितीद्वारे कौशल्य व मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या शिफारशी केल्या गेल्या. त्यानुसार भारतीय ज्ञान प्रणाली आणि भारतीय व्यवसाय प्रणाली कसे उपयुक्त आहे हे विशद करून हे पुस्तक ऑनलाईन पोर्टल वरून सर्व विद्यार्थी, शिक्षक व सर्वाना कसे उपलब्ध होणे आवश्यक आहे असे सूचित करून लेखकांना शुभेच्या दिल्या.
तसेच मा. कुलगुरु यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या पुस्तकात लिखित वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्यार्थ्यांना ज्ञानशास्त्र आणि भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) व भारतीय व्यवसाय मॉडेलची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हे पुस्तक बी कॉम तसेच बी बी ए च्या विद्यार्थाना त्यांच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त आहेच त्याचबरोबर समाज्यातील प्रत्येक घटकाच्या निरंतन शाश्वत विकास करण्यास भारतीय ज्ञान प्रणाली आणि भारतीय व्यवसाय प्रणाली कसे उपयुक्त आहे. तसेच कौशल्य वाढीबरोबर प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल व उच्च प्रतीचे जीवनमान कसे जगात येईल यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली आणि भारतीय व्यवसाय प्रणाली कशी महत्वपूर्ण आहे हे नमूद केले. याचबरोबर कुलगुरू यांनी या पुस्तकाबरोबर भारतीय ज्ञान प्रणाली आणि भारतीय व्यवसाय प्रणाली संबधी काही अधिक संदर्भ साहित्य उपलब्ध करून द्यावे, काही व्याखाने द्यावीत तसेच हा विषय कसा शिकवावा यासंबंधी शिक्षकांना कार्यशाळा घ्याव्यात असे लेखकांना सूचित करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विलास शिंदे, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभागचे अधिष्ठाता डॉ श्रीकृष्ण महाजन, एम बी ए विभागाच्या प्र संचालिका डॉ दीपा इंगवले, विभागाचे डॉ के व्ही मारुलकर तसेच इतर प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्याचे आभार पुस्तकाचे सहलेखक डॉ आर एस साळुंखे यांनी केले.