‘भारतीय वारसा स्थळे : विज्ञानाच्या चष्म्यातून’ चे प्रकाशन
नागपूर : ‘भारतीय वारसा स्थळे: विज्ञानाच्या चष्म्यातून’ या वारसा स्थळाचा इतिहास तसेच त्या मागील विज्ञान सोप्या भाषेत, रंजकतेने व गोष्टींच्या स्वरूपात सांगणाऱ्या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्वशास्त्र माजी विभाग प्रमुख, टागोर फेलो, प्राध्यापक डॉ चंद्रशेखर गुप्त यांच्या हस्ते अभ्यंकर नगर नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले.

या पुस्तकाने विज्ञानाच्या चष्म्यातून वारसा स्थळांकडे बघण्याची नवी दृष्टी दिली आहे.
वारसा स्थळांमागे श्रद्धे बरोबर वैज्ञानिक तर्क आणि गणित असून विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी आणि सामान्य वाचकांनी या वारसा स्थळांकडे वैज्ञानिक आणि पुरातात्त्विक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. असे उद्गार त्यांनी काढले. या पुस्तकामुळे आपल्या भूतकाळाचे स्मरणच नाही तर विज्ञान आणि वारसा यांचे नवे नाते समजण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पुस्तकाचे लेखन डॉ मानसी कोलते, डॉ माधुरी देवतळे, डॉ संजय ढोबळे या लेखक त्रयींनी केले असून या पुस्तकाला नागपूरचे लेखक व इतिहास अभ्यासक प्रवीण अविनाश योगी व अमर सेवा मंडळाच्या अध्यक्ष डॉ सुहासिनी वंजारी यांची प्रस्तावना लाभली आहे. याप्रसंगी आदित्यशेखर गुप्त, पद्मा गुप्त, मंगेश कोलते, वरद कोलते उपस्थित होते. पुण्याच्या ‘निराली’ प्रकाशनने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.