जलसंवर्धन विषयावर दुधड येथे जनजागृतीपर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न
पाणी संवर्धन काळाची गरज – प्रा डॉ प्रफुल्ल शिंदे
छत्रपती संभाजीनगर : आपला भाग आवर्षण प्रवनक्षेत्रात येत असल्यामुळे तसेच वातावरणात होत असलेल्या बदलामुळे यापुढे पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे. आपण पडणारे पाणी तर वाढवू शकत नाही परंतु पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीत कसा मुरेल आणि उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर कसा करता येईल याकडे गांभीर्याने लक्ष देऊ शकतो. समकालीन काळामध्ये पाण्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा डॉ प्रफुल्ल शिंदे यांनी केले.
एमजीएम रेडिओ ९०.८ एफएम, स्मार्ट, युनिसेफ, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंवर्धन या विषयावर दुधड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, एमजीएम विद्यापीठाचे भूवैज्ञानिक डॉ प्रफुल्ल शिंदे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमास सरपंच गंगासागर चौधरी, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी, युवक मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा डॉ शिंदे म्हणाले, सध्या उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या काही सोप्या पद्धतीमध्ये गळके नळ, पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या दुरुस्त करणे, दाढी करताना, ब्रश करताना, बेसिनचा नळ बंद करणे, धुणे – भांड्याच्या पाण्याचा पुनर्वापर करणे, शोष खड्डे आदींचा समावेश होतो.
या कार्यक्रमात पाणी बचतीवर यूनीसेफच्यावतीने तयार करण्यात आलेल्या प्ले स्टोअरवरील ‘why waste’ या ॲपविषयी माहिती देऊन ते डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमजीएम रेडिओचे केंद्रप्रमुख सुनील शिरसिकर यांनी केले तर सूत्रसंचालन आर जे मनीषा यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ग्रामसेवक संतोष मर्मट यांनी मानले. हा जनजागृतीपर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आर जे अदनान, अश्विनी निटूरकर आणि ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.