एमजीएम विद्यापीठात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
युवा पिढी व्यसनमुक्त असणे काळाची गरज – सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे
छत्रपती संभाजीनगर : अंमली पदार्थांचे सेवन हा मानसिक आजार असून याचे दुष्परिणाम सेवन करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबावर, समाजावर होत असतात. तज्ञांच्या मदतीने कोणत्याही व्यवसनांवर मात करता येते. आपण सगळे विद्यार्थी हे आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहात. हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी युवा पिढी व्यसनमुक्त असणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी यावेळी केले.
एमजीएम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्स भौतिकशास्त्र विभाग आणि छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना’निमित्त विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात ‘अवेरनेस इन युथ’ कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी, पोलीस नाईक किरण आघाव, पोलीस कॉन्स्टेबल विशाल जाधव, विभागप्रमुख डॉ के एम जाधव, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. या जनजागृतीपर कार्यक्रमात अंमली पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम, अंमली पदार्थांच्या विविध प्रकारांसह विद्यार्थ्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस नाईक किरण आघाव म्हणाले, भारत हा जगातील सर्वात तरूण देश आहे. अंमली पदार्थांच्या एकंदरीत व्यवसायाचे स्वरूप पाहता यामध्ये संबंधित लोकं तरुणांना लक्ष्य करीत आपल्या जाळ्यामध्ये ओढून आपला उद्देश साध्य करीत असतात. तरुणांना या व्यवसायामध्ये आणि व्यसनांमध्ये अडकवून अप्रत्यक्षपणे देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावण्याचे काम केले जात आहे. यास योग्य वेळी थांबवणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना कुठेही असा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस दलाशी संपर्क साधण्याचे या माध्यमातून आपणास आवाहन करतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ के एम जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मानसी महाडीक यांनी तर आभार डॉ क्रांती झाकडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ सूर्यकांत सपकाळ, डॉ गजानन लोमटे, डॉ निकेश इंगळे, डॉ हर्षदा पाटील, डॉ लोकेंद्र प्रतापसिंग व सर्व संबंधितांनी प्रयत्न केले.