पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाला विद्यापीठाकडून ५१ हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरुष) स्पर्धेत यजमान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा निरज जोशी हा मॅन ऑफ द टुर्नामेंट तर याच विद्यापीठाचे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अमेय कोळी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सौरभ सिंग यांना गौरविण्यात आले. सौराष्ट्र विद्यापीठाचा रामदेव आचार्य हा उत्कृष्ट फलंदाज ठरला. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. दरम्यान कुलगुरूंनी विजेत्या कबचौ उमवि संघाला विद्यापीठाकडून ५१ हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर केले.
सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी या स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे,व्यवस्थापन परिषद सदस्य व स्पर्धा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष अॅड अमोल पाटील, नितीन झाल्टे, डॉ. पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सीए रवींद्र पाटील, सिनेट सदस्य दीपक बंडू पाटील, दिनेश खरात, स्वप्नाली महाजन, अॅड केतन ढाके, सुरेखा पाटील तसेच प्रा. ए. एम.महाजन, अरविंद देशपांडे, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, देवदत्त पाटील, डॉ. हसीम तडवी, डॉ.किशोर पवार, प्रा. शैलेश पाटील स्पर्धेचे निरीक्षक डॉ. राजेश सोबती, डॉ. नूर महम्मद, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते.
या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अमेय कोळी यास पारितोषिक देण्यात आले. त्याने स्पर्धेत १२ बळी घेतले. स्पर्धेत २६२ धावा काढणारा सौराष्ट्र विद्यापीठाचा रामदेव आचार्य हा उत्कृष्ट फलंदाज ठरला. कबचौ उमविचा सौरभ सिंग हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला तर १७४ धावा आणि १३ गडी बाद करणारा कबचौ उमविचा निरज जोशी याला मॅन ऑफ द टुर्नामेंट ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी कबचौ उमविच्या संघाला ५१ हजार रूपयाचे पारितोषिक जाहीर केले. भविष्यात पश्विम विभागीय स्पर्धेत कोणत्याही खेळात सांघिक विजेतेपद पटकावणाऱ्या कबचौ उमविच्या संघाला ५१ हजार आणि याच स्पर्धेत वैयक्तिक विजेतेपद प्राप्त करणाऱ्या खेळाडूला ११ हजार रूपये विद्यापीठाकडून दिले जातील अशी घोषणा केली. पारितोषिक वितरण समारंभाचे सुत्रसंचलन प्रा. जी. ए. उस्मानी यांनी केले. आनंद उपाध्याय यांनी आभार मानले. या स्पर्धेत ५८ संघ सहभागी झाले होते. एकुण ६१ मॅचेस झाल्या. ११६ इनिंगमध्ये १४ हजार ६४६ धावा झाल्या तर ८६७ गडी बाद झाले. स्पर्धेत केवळ १ शतक झाले तर ४२ खेळाडूंनी अर्धशतक केले. १३२६ चौकार आणि ४३६ षटकारांचा पाऊस पडला.