शिवाजी विद्यापीठाच्या प्रियांका माळकर यांचे रशियन भाषा विषयात ‘नेट’ परीक्षेत यश
कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेण्यात आलेल्या ‘नेट’ – डिसेंबर २०२३ या परीक्षेत प्रियांका माळकर यांनी रशियन भाषा या विषयात नुकतेच मोठे यश संपादन केले. या परीक्षेत ३०० पैकी १७२ गुण मिळवून त्या गुणवत्ता यादीत प्रथम स्थानी आल्या आहेत. त्या शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागात सहयोगी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
शिवाजी विद्यापीठात १९७० साली रशियन भाषा केंद्र स्थापन झाले. प्रियांका माळकर यांनी याच विद्यापीठातील विदेशी भाषा विभागात रशियन भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून सुरुवात करून एम. ए. पदवी प्राप्त केली. अत्यंत परिश्रमपूर्वक या परीक्षेचा अभ्यास केला व यश प्राप्त केले. त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विदेशी भाषा विभागातर्फे झालेल्या सत्कार समारंभात विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी ‘भविष्यात प्रियांका माळकर या नक्कीच रशियन भाषेच्या एक उत्तम शिक्षिका व संशोधक म्हणून नावलौकिक मिळवतील व कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील’, असा विश्वास व्यक्त केला. प्रियांका यांना विदेशी भाषा विभागातील सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.