अभ्यासक्रमासह मुल्यमापन पद्धती बदलणे गरजेचे – माजी कुलगुरु डॉ विजय पांढरीपांडे
’मालविय मिशन’ मध्ये प्राचार्यांची कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांना नेमके काय शिकवायचे, किती, कसे अन् कुठे शिकवायचे ही चतुःसूत्री शिक्षकांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यापन, अभ्यासक्रमासोबतच मुल्यमापनाची पध्दती बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी कुलगुरु डॉ विजय पांढरीपांडे यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युजीसी ’मालविय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटर’मध्ये प्राचार्यांची कार्यशाळा बुधवारी (दि.२०) घेण्यात आली. ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पदवी व पदव्यूत्तर स्तरावर प्रभावी अंमलबजावणी’ हा विषय होता. यावेळी कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप, संचालक डॉ सतीश पाटील, सहसंचालक डॉ मोहम्मद अब्दुल राफे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी चार जिल्हयातून २४५ प्राचार्य, प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यशाळेचे बीजभाषण डॉ विजय पांढरीपांडे यांनी केले. ते म्हणाले, शिक्षकी पेशा ही एक ’पॅशन’ असून अध्यापनासाठी आवश्यक ते बदल करुन घेण्याची मानसिकता शिक्षकांमध्ये असली पाहिजे. ’आयसीटी, माहिती तंत्रज्ञान व नवा समाज माध्यमांमुळे विद्यार्थ्यांना ज्ञान, रंजन हा प्रबोधनाची अनेक माध्यमे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ’इंटरॅक्टिव्ह’ पध्दतीने शिकविणे गरजेचे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीवरच यश अवलंबून आहे, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ गजानन सानप यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रभावी अंमजबजावणी शासन, विद्यापीठे व महाविद्यालये सर्वांनीच सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात डॉ वाल्मिक सरवदे यांनी विद्यापीठाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. दिवसभरात डॉ महेश डहाक, प्राचार्य डॉ सर्जेराव ठोंबरे, डॉ प्रशांत साठे, डॉ सतीश पाटील आदींनी मार्गदर्शन केले. डॉ मोहम्मद अब्दुल रापेâ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेसाठी अर्चना येळीकर, अस्मिता जोंधळे, अमोल मदन, राजु कणिसे, गौरव जाधव आदींनी परिश्रम घेतले.