राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून जागतिक नागरिक घडविणे आवश्यक – कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के

कोल्हापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत असताना कौशल्यधारक जागतिक नागरिक तयार करण्यासाठी सर्वांच्या विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध विषयांच्या अनुषंगाने राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित केलेल्या महाविद्यालयातील प्राचार्यांच्या बैठकीस अध्यक्षस्थानावरून उद्बोधीत करताना कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

डॉ श्रीकृष्ण महाजन, अधिष्ठाता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत माहिती विशद करताना म्हणाले, एनईपीची अंमलबजावणी करणे म्हणजे फक्त ढाचा तयार करणे असे नाही. यामध्ये सगळयात महत्वाचा बदल म्हणजे परिणामाधारित शिक्षण राबविणे आणि त्याद्वारे चॉईस बेसड् क्रेडीट सिस्टीम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे. नाविण्यपूर्ण शैक्षणिक पध्दतींचा अवलंब करून शिक्षकांच्या क्षमता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेेचे आहे. 

Advertisement

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागातील अधिकारी आनंद मापुस्कर आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राबाबत मार्गदर्शन करताना म्हणाले, ग्रामपंचायतींच्या ठिकाणी कौशल्य केंद्र असले पाहिजेत यासाठी ५११ कौशल्य केंद्रे सुरू केलेली आहेत. १२० महाविद्यालयांपासून ही संख्या सुरू करून हजार महाविद्यालयांपर्यंत हे घेवून जावयाचे आहे. उच्च शिक्षण हे कौशल्यपूरक असले पाहिजे यासाठी हे विशेष प्रयत्न केले जात आहेत. राज्य आणि केंद्रीय पातळीवरील कौशल्य विकासाच्या विविध योजना महाविद्यालयस्तरांवर राबविणे आवश्यक आहे. जिल्हानिहाय नोंदणी शिबीराचे लवकरच आयोजन केले जाईल.

याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळ, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य विभागाचे संचालक डॉ सागर डेळेकर यांनी मार्गदर्शन केले. 

प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ प्रकाश गायकवाड, आजीवन व विस्तार विभागाचे संचालक डॉ रामचंद्र पवार यांचेसह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयातील महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक मोठयासंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page