अमरावती विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञानकथा दिनानिमित्त विविध विज्ञान कथांचे अभिवाचन
विज्ञान प्रसारासाठी साहित्याचे योगदान महत्त्वाचे – डॉ माधव पुटवाड
अमरावती : अवतीभोवती असलेली सर्वसामान्य माणसे, त्यांचा सभोवताल, दैनंदिन जीवनानुभव कथांच्या माध्यमातून मांडण्याची दीर्घ परंपरा आहे. अनुभवांची कौशल्यपूर्ण गुंफण करण्यातून जसा कथार्थ सूचित होतो, तशी लेखकांची जीवनदृष्टीही त्यातून प्रकटते, असे प्रतिपादन समीक्षक प्रा डॉ माधव पुटवाड यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञानकथा दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान कथांच्या अभिवाचन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा डॉ प्रणव कोलते उपस्थित होते.
नामवंत खगोल शास्त्रज्ञ, साहित्यिक डॉ जयंत नारळीकर यांचे मराठी विज्ञान कथाक्षेत्रातील योगदान लक्षात घेता, यांचा जन्मदिवस १९ जुलै हा राष्ट्रीय विज्ञानकथा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञानकथेला आधुनिक चेहरा देणारे साक्षेपी लेखक म्हणून डॉ नारळीकरांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील साहित्य व विज्ञान संस्थांनी या दिवशी विज्ञानकथा स्पर्धा, विज्ञानकथा वाचन, विज्ञानकथा कथन, चर्चा, परिसंवाद, भाषणे असे कार्यक्रम ठेवावेत, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेने केले होते. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सन २०२२ पासून १९ जुलै हा दिवस राष्ट्रीय विज्ञानकथा दिन म्हणून साजरा केला जात असून महाराष्ट्रात यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉ प्रणव कोलते यांनी आपल्या मनोगतातून देशातील सर्वसामान्य माणसात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान प्रसाराची आवश्यकता असून त्यासाठी साहित्य हे सशक्त माध्यम आहे.विज्ञान साहित्याची निर्मिती जेवढी विपूल होईल तेवढे मराठी साहित्य अधिक समृद्ध होईलअसे प्रतिपादन केले.
यावेळी जयंत नारळीकर व जयंत देशपांडे यांच्या विज्ञान कथांचे अभिवाचन करण्यात आले. अभिवाचक म्हणून सारिका वनवे, अमृता राऊतयांनी सहभाग नोंदविला. यावेळी विभागातील अंशदायी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अभिजित इंगळे यांनी तर आभारप्रदर्शन वैष्णवी मुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष तायडे, राजकुमार चांदेकर, साधना पोकळे, प्राजक्ता गवई यांनी विशेष परिश्रम घेतले.