एमजीएम विद्यापीठाच्या मुद्रण चित्राची ‘द बाँबे आर्ट’ सोसायटी प्रदर्शनात मांडणी
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झाले सादरीकरण
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनमधील फाईन आर्ट शाखेतील अंतिम वर्षात शिकत असलेल्या प्रसाद राजेंद्र गायकवाड याच्या मुद्रण चित्राची मांडणी द बाँबे आर्ट सोसायटीतर्फे जहांगीर आर्ट गॅलरीमधील प्रदर्शनासाठी करण्यात आली होती.
तज्ज्ञांच्या समितीतर्फे देशभरातील उत्कृष्ट कलावंत आणि कला विद्यार्थ्यांच्या कलाकृती या प्रदर्शनासाठी निवडल्या गेल्या आहेत. ‘द ऑनीयन फ्लावर’ असे या मुद्रण चित्राला आपण शिर्षक दिले असून हे मुद्रण चित्र आपल्या शेतकरी वडिलांच्या कष्टाला समर्पित केले असल्याची माहिती प्रसादने दिली आहे. कोलोग्राफ प्रकारातील हे चित्र असून याचे वैशिष्ट्य म्हणजे या कलाकृतीमध्ये पिवळसर छटा आणि या रंगाच्या पोताचे संयोजन आहे. प्रसादचा या सृजनात्मक मुद्रण कलाप्रकारामध्ये हातखंडा असल्याची माहिती त्याचे मार्गदर्शक प्राध्यापक सचिन कांबळे यांनी दिली आहे.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी प्रसाद आणि त्याच्या मार्गदर्शकांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गा़डेकर, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई यांनी प्रसादला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून त्याचे आणि त्याच्या मार्गदर्शकांचे कौतुक केले आहे.