मराठी भाषा गौरव दिनानिमित्त श्री शिवाजी महाविद्यालयात दोन अंकी कौटुंबिक नाटकाचे सादरीकरण
अभिजात भाषा मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने ‘गंमत असते नात्याची’ रविशंकर झिंगरे लिखित नाटकाच्या सादरीकरणास रसिकश्रोत्यांनी दिला उत्तम प्रतिसाद
परभणी : श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने एक अत्यंत खास कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात प्रा रविशंकर झिंगरे लिखित व विजय करभाजन दिग्दर्शित दोन अंकी कौटुंबिक नाटकाचे सादरीकरण महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये सायंकाळी सात वाजता झाले.





नाटकाला उपस्थित रसिक कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे महाविद्यालय विकास समिती प्रमुख हेमंतराव जामकर, दिग्दर्शक विजय करभाजन, नाटकाचे लेखक प्रा रविशंकर झिंगरे, प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ रोहिदास नितोंडे, मराठी विभाग प्रमुख डॉ प्रल्हाद भोपे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नाटकामध्ये मुख्य भूमिका किशोर पुराणिक, डॉ अर्चना चिक्षे, मोनिका गंधर्व आणि वैभव उदास यांनी साकारल्या. नाटकाची संगीतरचना त्र्यंबक वडसकर, प्रकाश योजना नारायण त्यारे, आणि नेपथ्य बालाजी दामूके यांनी केली.
नाटकाने मध्यमवर्गीय समकालीन दोन पिढ्यांच्या नात्यांचे भावविश्व चपखलपणे दर्शवले. लेखन आणि अभिनय या दोन्हीचं अनोखं मिश्रण दर्शकांना हृदयस्पर्शी ठरले. नात्यांमधील ताण-तणाव, प्रेम, समजून उमजून वावरणे यावर नाटकाने विचार मांडले. प्रा रविशंकर झिंगरे यांच्या लेखनात मानवी हृदयाचे विविध पैलू उलगडले गेले, आणि संवाद, संगीत, नेपथ्य, आणि अभिनयातील एकसंधपणा सर्वांसमोर आला.
कार्यक्रमात रसिकांनी नाटकास भरभरून प्रतिसाद दिला, आणि महाविद्यालय परिवार व पंचक्रोशीतील अनेक रसिकांनी या नाटकाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ जयंत बोबडे यांनी मानले.
शिवाजी महाविद्यालय प्रशासनाने या नाटकाच्या आयोजनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले असून, लेखक प्रा रविशंकर झिंगरे, दिग्दर्शक विजय करभाजन व नाटकातील कलावंतांचे कौतुक आणि अभिनंदन केले.