सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १० जुलै रोजी प्रवेशपूर्व परीक्षा

दुसऱ्यांदा संधी : विद्यार्थ्यांनी दि ९ जुलैपर्यंत अर्ज करावे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलातील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे पुन्हा एकदा नियोजन करण्यात आले असून दि १० जुलै २०२४ रोजी ऑनलाइन माध्यमातून ही प्रवेशपूर्व परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे यांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावरील ऍडमिशन डेस्क या लिंकवर जाऊन विविध  अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २ जुलै २०२४ पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना दि ९ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पदवी उत्तीर्ण विद्यार्थी व पदवी अंतिम परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षेसाठी बसता येणार आहे. दि १० जुलै २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे.

पदार्थविज्ञान संकुलाच्या एमएससी फिजिक्स – अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स, कंडेन्सड मॅटर फिजिक्स, एनर्जी स्टडी, सॉलिड स्टेट व नॅनो फिजिक्स, एमएससी इलेक्ट्रॉनिक सायन्स, इलेक्ट्रॉनिक अंड इलेक्ट्रॉनिक्स इंटरनेट ऑफ थिंग्स अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. तसेच विद्यापीठ संकुलातील एमएससी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मटिक्स या अभ्यासक्रमांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. 

Advertisement

विद्यापीठ संकुलातील एमएससी केमिस्ट्रीच्या पॉलिमर, ऑरगॅनिक, इंडस्ट्रियल, मेडिसिनल केमिस्ट्री, इनऑरगॅनिक, फिजिकल, एनालिटिकल, फार्मास्युटिकल, एमएससी इन्व्हरमेंटल सायन्स, एमएससी कम्प्युटर सायन्स मॅथेमॅटिक्स, एमएससी स्टॅटिस्टिकस, एम ए मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे. याचबरोबर एमएससी बॉटनी, झूलॉजी, एमएससी ऍग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, इंटरप्रिनरशिप या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. विद्यापीठ संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून वेळापत्रका नुसार प्रवेशपूर्व परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

विद्यापीठ अधिविभागात या अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश

एमएससी जिओलॉजी, जिओइन्फॉर्मेटिक्स, एम ए प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्र, ग्रामीण विकास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि इतिहास, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, एम ए मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, उर्दू, पाली, प्राकृत आणि कन्नड, एम ए संगीत, नाटक, तबला व पखवाज आणि व्हिज्युअल आर्ट्स, एम कॉम ऍडव्हान्स अकाउंटन्सी, ऍडव्हान्स बँकिंग, बीव्होक पत्रकरिता व जनसंज्ञापन, ऍडव्हान्स पी जी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मीडिया, पी जी डिप्लोमा इन म्युझिकोलॉजी, फाईव्ह इयर एमटेक कोर्स इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, पीजी डिप्लोमा इन डायटिक्स अँड न्यूट्रिशन आणि एम ए योगा या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाच्या परिसरातील अधिविभागांमध्ये थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

ही प्रवेश पूर्व परीक्षा वेब बेस्ड ऑनलाइन प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. प्रवेश पूर्व परीक्षा शुल्क पाचशे रुपये राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांची प्रवेश पूर्व परीक्षा द्यावयाची आहे, त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमांसाठी २०० रुपये अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे. परराज्यातील पात्र विद्यार्थ्यांनाही विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा देता येणार असल्याचे प्र-कलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page