अमरावती विद्यापीठाच्यावतीने प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम स्मृती ग्रामगीता व्याख्यानमालेचे पुष्प गुंफले
सुभाष पाळेकर शेती तंत्रज्ञानानेच शेतीतील उत्पन्न दुप्पट होऊ शकेल – डॉ सुभाष पाळेकर
अमरावती : हरित क्रांती झाली, परंतु मोजक्या अन्नधान्याचे उत्पादन पाहता सर्व अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो पाहिजे, यासाठी माझे शेतीतंत्रज्ञानाने शेती केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने होऊ शकेल, असे प्रतिपादन डॉ सुभाष पाळेकर यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम जन्मशताब्दी केंद्रीय समिती, अमरावती यांच्याकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व श्री वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम स्मृति ग्रामगीता व्याख्यानमालेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले, त्याप्रसंगी ‘राष्ट्रसंतांना अभिप्रेत ग्रामगीतेतील शेती आणि समृध्दी’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नवोपर्पम, नवसंशोधन व साहचार्य मंडळाचे संचालक डॉ अजय लाड, प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम केंद्रीय समिती अध्यक्ष मधुभाऊ घारड, दयाराम पटेल स्मारक ट्रस्ट, धारणीचे अध्यक्ष वीणाताई मालवीय, प्राचार्य डॉ विजयकुमार गवई, जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रदीप भिसे उपस्थित होते.
डॉ पाळेकर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षणाची आज गरज आहे. कौशल्ययुक्त असे अभ्यासक्रम पाहिजेत. राष्ट्रसंतांनी सुध्दा ग्रामगीतेमध्ये परंपरागत शेतीला महत्व दिले आहे. ज्याप्रमाणे जंगलांमधील झाडांना खत, फवारा न देता फळं येतात, त्याप्रमाणे आपणही आपल्या शेतातील पिकांना खत, फवारणी न करता फळं मिळवू शकतो, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, पदवी वा उच्च शिक्षण घेत असतांना कौशल्यपूर्ण शिक्षण राहिल, याकडेही लक्ष द्यावे. कृत्रिम बुध्दीमत्तेचा धोकाही विद्यार्थ्यांनी ओळखला पाहिजे. तंत्रज्ञान बदलत आहे, त्यामुळे आत्ताच सावध व्हा. जीवनशैली बदला असे आवाहन त्यांनी केले.
शाश्वत शेती तंत्रज्ञान पुढे नेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मान्य केल्याचे सांगून कुठलेही खत हे पिकांचं अन्न होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले. विषमुक्त अन्नधान्य सर्वांना मिळायला हवे, तसेच शेतीतील उत्पादन वाढले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. देशभरात विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन शेतीतंत्रज्ञानावर प्रशिक्षण देण्याचे माझे कार्य निरंतर सुरू असून माझ्या चळवळीतून भविष्यात शेतीची पोत वाढून विषमुक्त अन्नधान्य जनतेला मिळेल, त्यांचे आरोग्य निरोगी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य विकसित करावे – डॉ अजय लाड
अध्यक्षीय भाषण करतांना ननसा संचालक डॉ अजय लाड म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य विकसित केले पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान पध्दतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. मेळघाटातील विद्यार्थी सुध्दा जॉब क्रिएटर होऊ शकतात, त्यासाठी कौशल्याचा वापर करावा. नोकरीच्या मागे न धावता विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्याचा रोजगारासाठी उपयोग करुन रोजगार देणारे व्हा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी मधुभाऊ घारड, वीणाताई मालवीय, आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. संचालन प्रा किशोर श्रीखंडे व आभार प्राचार्य विजयकुमार गवई यांनी मानले. कार्यक्रमाला अरविंद मेहता, माधुरी मेहता, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, शेतकरीवर्ग, गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.