छत्रपती संभाजीनगरात देवगिरी महाविद्यालयामार्फत ६०० वृक्षांचे वृक्षारोपण
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सातारा डोंगर परिसरात ६०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. मेढशिंगी, अजाण, निरगुड, अडुळसा, करवंद, फनशी, महारुख, देवबाभूळ, बाभूळ, भोकर, अर्जुन, शिवण, शिरी, पारस, पिंपळ, पाखड, खैर, काळा कुडा, शिसम, शमी यांसारख्या देशी व आयुर्वेदिक झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन स्वयंसेवक विद्यार्थी करणार आहेत.
‘एक स्वयंसेवक – एक वृक्ष’ या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. पर्यावरण पूरक वृक्ष लागवड ही महाविद्यालयाची वार्षिक परंपरा बनली असून यामध्ये दुर्मिळ प्रजातींचा समावेश केला जातो.

या उपक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “निसर्गातील बदल, अनियमित पाऊस व वाढते तापमान यावर उपाय म्हणून वृक्षारोपण हीच प्रभावी उपाययोजना आहे. प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लावून त्याचे संगोपन केले तर पृथ्वीचा समतोल राखता येईल. विद्यार्थी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन देशाच्या विकासात हातभार लावतात, हीच खरी राष्ट्रीय सेवा आहे.”
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते, इंजि. रोहित ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक व कार्यक्रमाधिकारी डॉ. अनंत कणगरे, कार्यक्रमाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ५० स्वयंसेवक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.
वृक्षारोपण उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवला.
