राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात हेक्सावेअर टेक्नॉलॉजीचा प्लेसमेंट ड्राईव्ह
विविध पदाकरिता विद्यार्थ्यांनी दिल्या मुलाखती
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस लिमिटेड मिहान या कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात बुधवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये विविध पदांकरिता विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी मुलाखतीकरिता आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस कंपनीकडून डाटा प्रोसेसिंग एक्झिक्यूटिव्ह या पदाकरिता ही निवड प्रक्रिया राबविली. याकरिता औषधी निर्माण शास्त्र पदविका तसेच पदवी धारण केलेले विद्यार्थी पात्र होते. अनुभवी तसेच नवीन विद्यार्थ्यांना मुलाखतीकरिता संधी देण्यात आली. या पदाकरिता एकूण २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी मुलाखतीला उपस्थिती दर्शविली.
विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागाकडून हा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. यावेळी रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ भूषण महाजन, हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस कंपनीच्या टीम कोच तथा वरिष्ठ अधिकारी ऋतुजा पवार, सीनियर एक्झिक्यूटिव्ह निखिल यादव, तय्यबा खान, एक्झिक्यूटिव्ह राजप्रीत बगाडे यांच्यासह गुरुनानक कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ शेखर वाईकर यांची उपस्थिती होती.