दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाच्या मॅपकॉन वार्षिक परिषदेत देशातील पॅथॉलॉजी तज्ज्ञांचा सहभाग

सहाशेहून अधिक प्रतिनिधी, २२५ सादरीकरणे : नवीन मानकांची निश्चिती

वर्धा : सावंगी (मेघे) येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय, वानाडोंगरी येथील पॅथॉलॉजी विभाग आणि पॅथॉलॉजिस्ट असोसिएशन महाराष्ट्र चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठात ४५ व्या मॅपकाॅन वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत देशभरातून सहाशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या परिषदेचे कार्यक्रमांचे उद्घाटन अभिमत विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या स्नातक वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ अरुणा वणीकर, कुलगुरू डॉ ललितभूषण वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ गौरव मिश्रा, एमएमसीचे प्रशासक डॉ विंकी रुघवानी, निदेशक डॉ इब्राहिम अन्सारी, मेघे समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अनुप मरार, संचालक डॉ तृप्ती वाघमारे, पॅथॉलॉजिस्ट असोसिएशन महाराष्ट्र चॅप्टरच्या अध्यक्ष डॉ शुभांगी आगळे, अधिष्ठाता डॉ उज्ज्वल गजबे तसेच विद्यापीठाचे पदाधिकारी आणि आयोजन समिती सदस्यांची उपस्थिती होती.

Advertisement

या परिषदेपूर्वी दोन निरंतर वैद्यकीय शिक्षण उपक्रम व एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. पहिला निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम मायक्रो इनसाइट्सवर नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसद्वारे घेण्यात आला. यात पॅथॉलॉजीमधील लहान बायोप्सीचे लँडस्केप नेव्हिगेट करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तर दुसरी सीएमई वर्तमान ट्रेंड आणि हेमेटोलॉजिकल इनसाइट्सवर यावर घेण्यात आली. यात ऑन्कोपॅथॉलॉजीमध्ये पोस्टडॉक्टरल उपक्रमासंदर्भात चर्चा करण्यात आली.

परिषदेपूर्वी आणि मुख्य परिषदेदरम्यान, ऑन्कोपॅथॉलॉजी क्षेत्रातील नामवंत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये गट चर्चा करण्यात आली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांनी सुमारे २५० पेक्षा अधिक शोधनिबंध आणि पोस्टर्सचे सादरीकरण केले. परिषदेत सहाशेहून अधिक प्रतिनिधींसह ३० तज्ज्ञ वक्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने प्रत्येक निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम व सादरीकरणासाठी विशेष मानक मंजूर केले. यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाचे सहकार्य लाभले.

समारोप कार्यक्रमात बेळगाव येथील केएलई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन गंगणे व मेघे अभिमत विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ श्वेता पिसूळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या परिषदेच्या अत्युत्कृष्ट व काटेकोर आयोजनासाठी मेघे समूहाचे विशेष कौतुक करीत एक नवीन मानदंड स्थापित केल्याची भावना समारोप प्रसंगी व्यक्त करण्यात आली.

या आयोजनात उपअधिष्ठाता डॉ बी आर सिंग, आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ सुनीता वाघ, सहअध्यक्ष डॉ प्रतिभा दवंडे, संघटन सचिव डॉ प्रवीण गडकरी, सहसचिव डॉ संजय देवतळे, डॉ ओबेद नोमन, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ बनकर, पॅथॉलॉजी विभागातील शिक्षक, पदव्युत्तर विद्यार्थी आदींचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page