शिवाजी विद्यापीठाच्या ऊर्जा साठवणूकविषयक उपकरणाच्या संशोधनास दोन पेटंट

 डॉ सागर डेळेकर, स्वप्नजीत मुळीक यांचे संशोधन

कोल्हापूर : नॅनो संमिश्रांवर आधारित ऊर्जा साठवणूकविषयक उपकरण निर्मितीच्या महत्त्वपूर्ण संशोधनास जर्मन आणि भारतीय अशी दोन पेटंट नुकतीच प्राप्त झाली आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ सागर डेळेकर आणि स्वप्नजीत मुळीक यांनी या संदर्भातील संशोधन केले आहे.

नॅनो संमिश्रांवर आधारित मटेरियलपासून तयार केलेल्या कॅथोडद्वारे सुपर कॅपॅसिटरची क्षमता वाढवण्यासाठीचे हे संशोधन आहे. सुपरकॅपॅसिटरच्या उपकरणासाठी निकेल कोबाल्टाइट, कोबाल्ट ऑक्साईड आणि पोरस कार्बनचा वापर करण्यात आला आहे. या नॅनो संमिश्रामुळे सदर उपकरणाची कार्यक्षमता विकसित होणार असून या संशोधनाद्वारे ऊर्जा क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडून येईल. जगाची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे ऊर्जेवरील वाढता ताण लक्षात घेता हे संशोधन ऊर्जा क्षेत्राला नवीन दिशा देणारे ठरेल.

Advertisement

हे उपकरण स्वच्छ, कमी खर्चिक स्वरूपाचे असून पारंपरिक ऊर्जेच्या वापराऐवजी हे नवीन उपकरण ऊर्जा संवर्धनासाठी नक्कीच प्रभावशाली ठरणार आहे. सदर संशोधनाचा लाभ ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संशोधकांसह समाजातील ऊर्जेच्या समस्यांवर उपाय म्हणूनही होणार आहे. या संशोधनामुळे तयार करण्यात येणारी उपकरणे ही सध्याच्या ऊर्जेची गरज लक्षात घेता ऊर्जा क्षेत्रासाठी अनमोल देणगी देणारी ठरतील, असा विश्वास डॉ. डेळेकर यांनी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल डॉ सागर डेळेकर व स्वप्नजीत मुळीक यांचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ विलास शिंदे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page