इंद्रधनुष्य महोत्सवात ”स्वारातीम” विद्यापीठाचा २४ कला प्रकारात सहभाग
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या १९ व्या इंद्रधनुष्य २०२३-२४ या आंतरविद्यापीठीय राज्यस्तरीय युवक महोत्सवात सहभागी झाला आहे. दि. ११ ते १५ मार्च या कालावधीत संपन्न होत असलेल्या या युवक महोत्सवात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कलावंतांनी एकूण २८ पैकी २४ कला प्रकारांमध्ये एकूण ४२ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे.
या युवक महोत्सवात आदिवासी नृत्य, शॉर्ट फिल्म मेकिंग, फोक ऑर्केस्ट्रा, स्किट, मुकाभीनय, वक्तृत्व, वादविवाद, समूहगीत, सुगम गायन, शास्त्री गायन, शास्त्रीय सुरवाद्य, शास्त्रीय तालवाद्य, इन्स्ट्रुमेंटल सोलो, शास्त्रीय नृत्य, मिमिक्री इत्यादी वांग्मय कला, संगीत, नृत्य, नाट्य,व ललित कलेतील सर्व कलाप्रकारात विद्यार्थी कलावंतांनी सहभाग घेऊन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव शिबिरात कसदार तयारी केलेली आहे. अत्यंत दमदार आणि प्रभावी सादरीकरण करून ‘लोकसंगीत वाद्यवृंद’ ( फोक आर्केस्ट्रा ) या कलाप्रकारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या पश्चिम विभागीय आंतरराज्य युवक महोत्सवात नैपुण्य मिळवत या विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पात्र झाला असून, आजवर संपन्न झालेल्या अनेक आंतरविद्यापीठ व राज्यस्तरीय युवा महोत्सवातून विद्यापीठाच्या कलावंतांनी आपल्या विद्यापीठाची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न होत असलेल्या इंद्रधनुष्य महोत्सवासाठी वाड्यमय प्रशिक्षक म्हणून डॉ. संदीप काळे, संगीत विभागाचे प्रशिक्षक डॉ. शिवराज शिंदे, नाट्य विभागाचे प्रशिक्षक दिलीप डोंबे, मृत्यू विभागाचे प्रशिक्षक संदेश हटकर, संजय जांबळदरे, डॉ. पांडुरंग पांचाळ, नवलाजी जाधव आदींनी मार्गदर्शन केले. तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. संदीप काळे, प्रा. माधुरी पाटील यांचा समावेश आहे.
उज्वल यश संपादन करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यार्थी कलावंतांना ऊर्जस्वल शुभेच्छा दिल्या . कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी कलावंत वादक प्रशिक्षक साथीदार असा सर्वांचा मिळून ५५ जणांचा संघ इंद्रधनुष्य महोत्सवासाठी रवाना झाला आहे. कार्यालयीन कर्मचारी संभा कांबळे, बालाजी शिंदे संघासाठी परिश्रम घेत आहेत.