पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त चित्र व ग्रंथ प्रदर्शन
लढवय्या अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचे चित्रांतून प्रभावी दर्शन!
सोलापूर, 28 मे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आज विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रदर्शनात अहिल्यादेवींचा करारी लढवय्या बाणा, धार्मिक व सामाजिक बांधिलकी आणि समर्पित कार्याचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.
डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात ललितकला व कला विभागातील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली 21 चित्रे मांडण्यात आली आहेत. यासोबतच अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावरील दुर्मीळ ग्रंथ व पुस्तके देखील पाहायला मिळत आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अमृता अकलूजकर, तसेच विद्यापीठाचे विविध विभागप्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद – 250 जणांची मोफत तपासणी
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठातील आरोग्य संकुलच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात 250 शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. अभिजीत जगताप यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल तपासण्या केल्या.