पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मराठी भाषा दिनानिमित्त लेखकांचा सन्मान
ज्ञान-परंपरांनी समृद्ध मराठी भाषेच्या अभ्यासासाठी संशोधक व मार्गदर्शकांची संख्या वाढवणार – कुलगुरू प्रा. महानवर
सोलापूर : मराठी म्हणजे गोडवा, प्रेम, आपुलकी बरोबरच महाराष्ट्र आहे. जात्यावरच्या ओव्या, अंगाई गीत, काव्य, भलई गीत आणि मोटावरच्या गाण्यांनी मराठी भाषा ही फुलली आहे. ज्ञान, परंपरांनी समृद्ध अशा मराठी भाषेच्या सखोल अभ्यासासाठी पुढील वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संशोधक मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी दिली.
मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विद्यापीठातील भाषा संकुल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन आणि छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षे पूर्तीनिमित्त आज्ञापत्र अभिवाचन, व्याख्यान, लेखकांचा सन्मान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू प्रा. महानवर हे बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, जालना येथील कवित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बार्शी येथील विज्ञान लेखक डॉ. सुनील विभुते यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमा पूजनेने करण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत भाषा व वाङ्मय संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले. डॉ. दत्ता घोलप यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राचे अभिवाचन डॉ. विजय शर्मा आणि प्रा. ममता बोल्ली यांनी केले.
डॉ. विभुते म्हणाले की, आजही समाजात विज्ञानाची जागरूकता कमी आहे. ज्या देशाकडे पूर्वी लष्करी सैन्य अधिक तो देश सुपर पॉवर होता, मात्र आज ज्या देशाकडे विज्ञान-तंत्रज्ञान आहे, तो देश अधिक सुपर पॉवर आहे. विज्ञान व तंत्रज्ञान वाढत आहे. मानवी जीवनावर याचा परिणाम आहे. सामाजिक समस्या साहित्यात प्रतिबिंब होण्यासाठी विज्ञानकथांचे लेखन मी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. विज्ञानाला साहित्याची जोड लावून सोप्या पद्धतीने आजच्या पिढीपर्यंत विज्ञान पोहोचविण्याची अत्यंत गरज आहे, असे ते म्हणाले.
प्रमुख वक्त्या डॉ. तडेगावकर यांनी ‘मराठी कविता: आज आणि काल’ या विषयावर बोलताना लोकसाहित्याचे महत्त्व अधोरेखित केले. संत तुकाराम, बहिणाबाई चौधरी, शांताबाई शेळके, इंदिरा संत यांच्या काव्य क्षेत्रातील योगदानाचा विशेष उल्लेख त्यांनी केला. भाषाविषयक समस्या सोडविण्यासाठी भाषेसाठीचा स्वतंत्र विद्यापीठ उभारणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. अलीकडच्या मराठी कवितेमध्ये होणाऱ्या इंग्रजी भाषेच्या अतिरेकाबद्दल त्यांनी चिंता ही व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ममता बोल्ली यांनी केले तर आभार प्रा. विद्या काळे यांनी मानले.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, जालना येथील कवित्री डॉ. संजीवनी तडेगावकर, विज्ञान लेखक डॉ. सुनील विभुते, डॉ. केदारनाथ काळवणे.