एमजीएममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग उत्सवाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या योग विज्ञान विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक २१ जून २०२४ रोजी सकाळी ०६:०० वाजता विद्यापीठाच्या जेएनईसी लॉन येथे योग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस या वर्षीसुद्धा योग विज्ञान, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, एमजीएम विद्यापीठ व अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे.
भारत सरकारच्या आयुष विभागाअंतर्गत यावर्षीची संकल्पना ‘स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ (yoga for self and society) असुन स्वतः सोबत समाज देखील निरोगी राहण्यास मदत होते. हा या वर्षीच्या संकल्पनेचा उद्देश आहे. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आयुष्य मंत्रालय भारत सरकार द्वारा सूचित पूरक हालचाली, योगासने, प्राणायाम व ध्यान यांचा सराव योगशिक्षक गंगाप्रसाद खरात हे करून घेणार आहेत. यामध्ये खरात हे उपस्थितांना प्रशिक्षण देणार असून सहभागी योग साधकांना आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला एमजीएम चे सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय योग दिवसामध्ये आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सहभागी होत असताना योग साधकांनी योगा मॅट, नॅपकिन, पाण्याची बाटली सोबत घेऊन यावी तसेच पांढरा टी शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू पॅन्ट परिधान करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क गंगाप्रसाद खरात यांच्यासमवेत ९४२३२७४४२२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता.