एमजीएममध्ये प्राचार्य प्रताप बोराडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ जेएनईसीच्या माजी विद्यार्थ्यांना करण्यात येणार प्रदान
छत्रपती संभाजीनगर : एमजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे यांचा पहिला स्मृती दिन सोमवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करीत पाळण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यास ‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वर्ष २०२४ ‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ उद्योजक श्रीकांत बडवे आणि स्वप्नेषु बसेर यांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती ‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ निवड समितीचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी यावेळी दिली.
विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात सोमवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या ‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृति सन्मान’ कार्यक्रमास एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम हे उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते तथा एमजीएमचे माजी विद्यार्थी समीर पाटील हे असणार आहेत.
‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ निवड प्रक्रिया
दरवर्षी दिनांक ५ ऑगस्ट रोजी प्राचार्य प्रताप बोराडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यास ‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये त्या संबंधित विद्यार्थ्याने आपापल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभासंपन्न काम केलेले असणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्याची निवड करण्याकरिता एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ पी एम जाधव, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर, प्रा जयदेव डोळे, अधिष्ठाता डॉ एच एच शिंदे, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, मुख्य वित्त अधिकारी भारत पेंटावार आदि व्यक्तींचा समावेश आहे.
‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ स्वरूप :
स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम रुपये १ लक्ष
‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ २०२४ वर्षाचे सन्मानार्थी
१. श्रीकांत बडवे : श्रीकांत बडवे हे जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचे सन १९८७ सालचे विद्यार्थी आहेत. त्यांनी १९८७ साली १ लक्ष आणि ३ कर्मचाऱ्यांसह बडवे इंजिनियरिंग लि (बेलराईस इंडस्ट्रीज) कंपनीची स्थापना केली. आज कंपनीची वार्षिक उलाढाल ५ हजार कोटी रूपयांची असून कंपनी शीट मेटल पार्ट्स, फॅब्रिकेशन अँड प्लास्टिक, कोटिंग ऑन मेटल्स असे विविध उत्पादने बनवते. कंपनीचे आज देशभरातील २८ ठिकाणी उत्पादन कारखाने असून यामध्ये सुमारे १५ हजार कर्मचारी काम करीत आहेत. त्यांनी या क्षेत्रात दिलेल्या आपल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये नॅशनल अवॉर्ड फॉर इंटरप्रुनरशिप, नॅशनल अवॉर्ड फॉर क्वालिटी प्रोडक्टस, नॅशनल अवॉर्ड फॉर रिसर्च अँड डेव्हपमेंट अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.
२. डॉ स्वप्नेषु बसेर : स्वप्नेषु बसेर यांनी जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल इंजिनियरिंग शाखेची सन १९८७ साली पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयआयटी दिल्ली येथून एम टेक आणि आयआयटी मुंबई येथून आपली पी एचडी पूर्ण केली आहे. सध्या ते देवेन सुपरक्रिटिकल प्रा लि कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले असून अनेक पेटेंट त्यांच्या नावावर आहेत. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असून यामध्ये एक्सलन्स इन इंटरप्रेनरशिप इन रिसर्ज अँड इनोव्हेशन अवॉर्ड, इकॉनॉमिक टाईम्स एमएसएमई एक्सलन्स आयकॉन्स अवॉर्ड, टेक्नॉलॉजी डेव्हलपर अवॉर्ड, यंग इंजिनियर अवॉर्ड आदींचा समावेश आहे.
प्राचार्य प्रताप बोराडे यांच्याविषयी माहिती :
मराठवाड्याच्या अभियायांत्रिकी शिक्षणाचा पाया रचणारे शिक्षण तज्ञ, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य प्रतापराव बोराडे यांनी आपल्या आठ दशकांच्या आयुष्यात हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली. नावीन्यता, वैविधता, कल्पकता, शिस्त हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मुख्य पैलू होते. आपल्या संपूर्ण शैक्षणिक कार्यकाळात त्यांनी विद्यार्थी केंद्रित धोरणे राबवित कायम विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले.
शालेय आयुष्यातच ते राष्ट्र सेवादलाच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांची वाटचाल समाजवादी विचारांप्रमाणे झाली. आयुष्यातला प्रत्येक निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतला व प्रचंड मेहनत घेऊन तो यशस्वी करून दाखवला. पवई आयआयटीसारख्या नामवंत संस्थेतून प्लॅस्टीक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांना नामवंत कंपनीत रुजू होण्याची संधी होती. मात्र ते विचारपूर्वक गुजरातमधील वापीसारख्या ग्रामीण भागातील एका नवीन कंपनीत रुजू झाले. कंपनीतील मशिनरी उभारणीपासून ते उत्पादनापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर काम केले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही अल्पावधीत हा कारखाना यशस्वी करून दाखवला.
प्रतापराव बोराडे यांनी औरंगाबादमध्ये भागीदारीत स्वतःची कंपनी ‘स्पॅडमा प्लास्टीक’ची उभारणी करून तिला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या उद्योगाची सुरुवात करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या अडचणी सगळ्याच लघुउद्योजकांच्या मार्गातील काटे आहेत हे त्यांनी जाणले. यातूनच त्यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन मराठवाडा लघु उद्योजक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून सगळ्या लघुउद्योजकांचे प्रश्न सरकारसमोर मांडलेच शिवाय विविध पातळ्यांवर संघर्ष करून त्या प्रश्नांची सोडवणूकही करून घेतली. त्यामुळे अल्पावधीतच प्रतापराव बोराडे हे नाव उद्योगविश्वात आदराने घेतले जाऊ लागले.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन सरकारने त्यांना ‘स्मॉल स्केल इंडस्ट्रिज’ या संस्थेवर संचालक म्हणून नेमले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभरातील लघू उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. बँकाकडून सुलभपणे लोण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न केले. या मंडळाचे संचालक म्हणून पैठणच्या साडी कारागिरांना प्रशिक्षण देऊन व त्यांना नवे मार्ग उपलब्ध करून देऊन, पैठणी साडीचे बंद पडलेले उत्पादन नव्याने सुरु केले. त्यामुळे पैठणची काळाआड जाऊ पाहणारी भरजरी साडी पुन्हा स्त्रियांच्या अंगावर शोभू लागली. मराठवाडा विकास महामंडळावरही संचालक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या माध्यमातूनही मराठवाड्यातील लघुउद्योगांना उभारी देण्याचे काम त्यांनी केले. ते टेक्नॉलॉजी बँकेच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना तंत्रज्ञान पुरवले. यामुळे प्रतापराव बोराडे हे नाव औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात कायमचे कोरले गेले.
१९८३ साली बोराडे यांना तत्कालीन शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांनी त्यांना इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्यपद स्विकारण्याची गळ घातली. ते नकार देऊ शकले असते. मात्र एक आव्हान म्हणून काही दिवसांसाठी जवाहरलाल नेहरू इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्यपद त्यांनी स्विकारले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विना अनुदान तत्वावरील हे कॉलेज त्यांनी यशस्वी केले. एवढेच नाही तर ‘जेएनईसी’ या नावाचा देशभर दबदबा निर्माण केला. एक इंजिनिअर म्हणून, जनरल मॅनेजर म्हणून, एक उद्योजक म्हणून, उद्योजकांचा प्रेरक, संघटक म्हणून जसे ते यशस्वी झाले तसेच ते प्राचार्य म्हणूनही ख्यातनाम झाले.
तब्बल एकवीस वर्षे प्राचार्य पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पेलली. जेएनईसी म्हणजे प्राचार्य बोराडे, अशी ओळख निर्माण केली. बोराडे सरांनी नावारुपाला आणलेली ही जेएनईसी पाहून शरद पवार यांनी त्यांना आग्रहाने बारामती इंजिनिअरींग कॉलेजचं प्राचार्यपद दिलं. अल्पावधीतच ते कॉलेजही त्यांनी नावारुपाला आणलं. बोराडे सरांनी आयुष्यात विविध भूमिका बजावताना मिळवलेलं प्रचंड यश पाहिलं तर प्रत्येकाला यातून प्रेरणा मिळेल.
राष्ट्र सेवादलाच्या विचारातून घडल्यामुळे असो की, आईवडीलाचे संस्कार असोत, त्यांनी तत्वनिष्ठेला सर्वाधिक महत्त्व दिल आहे. भ्रष्ट मार्गाचा वापर करायचा नाही. कुणाला लाच द्यायची नाही की कोणाकडून ती घ्यायची नाही. लाच मागणाऱ्यांबरोबर व्यवहार करायचा नाही, ही त्यांची जीवननिष्ठा अतिशय दुर्मिळ म्हणावी लागेल. मी माझ्या आयुष्यात एकदाही, कोणालाही लाच दिली नाही, असे अभिमानाने सांगणारे प्रतापराव बोराडे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अशी व्यक्ती समाजात अपवादानेच पाहायला मिळते.
सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची जाण त्यांनी विद्यार्थ्यात रुजवली. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी बिहार राज्यात १९८८ साली आलेल्या महापुराच्यावेळी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन २ लाख रुपये जमवणे असो की भुज भूकंप मदत, केरळ महापूर मदत त्याचप्रमाणे किल्लारी येथील भूकंपाच्यावेळी ७ लाख रूपयांचा मदत निधी देणे असो ते कायम अडचणीच्या काळामध्ये पुढाकार घेऊन कार्यरत राहिले.