अमरावती विद्यापीठात ९ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन
‘विदर्भातील प्रादेशिक असमतोल : स्वरुप, आव्हाने आणि उपाय’ विषयावर चर्चासत्र
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्र व विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० ते ०५:०० दरम्यान विद्यापीठ परिसरातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहात होणा-या या राज्यस्तरीय चर्चासत्रात ‘विदर्भातील प्रादेशिक असमतोल : स्वरुप, आव्हाने आणि उपाय’ या विषयावर विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य डॉ संजय खडक्कार हे बीजभाषण देणार आहेत.
चर्चासत्राचे अध्यक्षस्थान प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे भूषविणार असून उद्घाटन विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ प्रवीण रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ रवींद्र कडू, वसंतराव नाईक मिशनचे अध्यक्ष निलेख हेलोंडे पाटील, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ गजानन पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटनानंतर दुपारी १२:३० ते ०२:०० दरम्यान होणा-या सत्रात ‘विदर्भातील कृषि समस्या आणि विकास’ या विषयावर वाय डी व्ही डी महाविद्यालय, तिवसा येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ प्रशांत हरमकर, दै लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मोहन अटाळकर मार्गदर्शन करतील. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य डॉ आर एम भिसे राहतील. दुपारी ०२:०० ते ०४:३० दरम्यान होणा-या सत्रात ‘विदर्भातील सिंचन अनुशेष आणि शेतकरी आत्महत्या’ या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ श्रीनिवास खांदेवाले व बोर्ड ऑफ स्टडिज अर्थशास्त्राचे अध्यक्ष डॉ आर बी भांडवलकर हे मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थान डॉ पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्राचे माजी समन्वयक डॉ सुरेश जगताप भूषवतील.
समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अविनाश असनारे, प्रमुख अतिथी म्हणून आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ एच ए हुड्डा यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या राज्यस्तरीय चर्चासत्राचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ महेंद्र मेटे, डॉ संजय कोठारी, डॉ विठ्ठल घिनमिने, कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी केले आहे.