उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सृष्टी संवर्धन शिबिराचे मोठ्या उत्साहात आयोजन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सुरु असलेल्या सृष्टी संवर्धन शिबिरात दररोज श्रमदान, पर्यावरण स्वच्छता याचे धडे गिरवत खान्देशातील तरूणाई विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात रमली आहे.
दि १ ते ७ जुलै या कालवधीत विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तीन जिल्ह्यातील संलग्नीत महाविद्यालयातील १६८ राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. यामध्ये ७४ विद्यार्थिंनींचा समावेश आहे. रोज सकाळी योगा, श्रमदान दुपारी व्याख्यान त्यानंतर संध्याकाळी गटचर्चा व सांस्कृतिक कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम आहे. ‘माय भारत डिजीटल लिटरसी’ ही शिबिराची संकल्पना आहे. विद्यापीठाचा परिसर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी ही तरूणाई रोज सकाळी विद्यापीठ परिसरात फिरून प्लास्टीक गोळा करणे, तण निर्मुलन त्यासोबतच बंधारे बांधणे आदी काम तन्मयतेने करतांना दिसत आहेत.
राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सचिन नांद्रे, राष्ट्रीय सेवा योजना चे जिल्हा समनव्यक डॉ दिनेश पाटील, डॉ शिला राजपूत, डॉ राजू पाटील, डॉ विश्वास भामरे, डॉ विशाल देशमुख यांच्या नेतृत्वाखालील हे शिबिर होत आहे. गेल्या तीन दिवसात निशिकांत काळे, डॉ अनिल भोकरे, सीए रवींद्र पाटील, प्रा व्ही एन रोकडे, विशाल सोनकुले, डॉ सचिन नांद्रे यांनी अनुक्रमे ग्रीन एनर्जी, सेंद्रीय शेती, पैशांची बचत, ग्लोबल वॉर्मिंग, प्लास्टीक मुक्ती आणि राष्ट्रीय सेवा योजना मध्ये युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. या विविध सत्रात अध्यक्ष म्हणून डॉ विजय आहेर, अधिसभा सदस्य दिनेश चव्हाण, डॉ महेंद्र महाजन, व्य प सदस्य डॉ पवित्रा पाटील, अधिसभा सदसय् अमोल मराटे, नेहा जोशी, यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.