दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात जागतिक दर्जाचे लघुपट निर्माण व्हावे व मराठवाड्यातील युवा सिने विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या प्रमुख हेतुने नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त मराठवाडास्तरीय शॉर्ट फिल्म (लघुपट) स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशनच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. केंद्रीय सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, एनएफडीसी व महाराष्ट्र शासनाचे विशेष सहकार्य या महोत्सवास लाभलेले आहे. प्रोझोन मॉल, अभ्युदय फाउंडेशन व एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस् हे सहआयोजक आहेत.
सदरील महोत्सव दि १५ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान आयनॉस, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील रहिवासी असलेल्या लघुपटाच्या निर्माता व दिग्दर्शकांसाठी ही स्पर्धा असेल. लघुपट जास्तीत जास्त १५ मिनिटांचा कालावधीचा असावा. तसेच लघुपटात दाखविला जाणारा सर्व तपशील हा स्वतः चित्रीत केलेला, मालकी असलेला किंवा परवानगी घेतलेला असावा. लघुपटाचे दिग्दर्शक अथवा निर्माते मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.
लघुपटाची निर्मिती ही १ ऑगस्ट २०२३ ते १९ ऑक्टोबर २०२४ या काळातील असायला हवी. प्रवेशासाठी अंतिम दिनांक २० ऑक्टोबर २०२४ आहे. उत्कृष्ट लघुपटास रोख रु २५,०००/- चे बक्षीस व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेतील निवडक शॉर्ट फिल्मचे प्रदर्शन महोत्सवात आयनॉस थिएटर मध्ये करण्यात येणार आहे. स्पर्धेस परिक्षक म्हणून चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर उपस्थित राहतील.परिक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.
स्पर्धेकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in या वेबसाईटला भेट देऊन आपले लघुपट सादर करावेत व अधिक माहितीसाठी महेश हरबक (दूरध्वनी : ०२४०-२४७८९०८) यांना संपर्क साधावा. असे आवाहन आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, मुख्य मार्गदर्शक अंकुशराव कदम, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी व महोत्सवाच्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.