देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन
दिनांक ८, ९ व १० फेब्रुवारी २०२४ रोजी होणार संपन्न
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालयात दिनांक ८, ९ व १० फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे ३३ वे वर्ष असून यावर्षी गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी नामवंत हिंदी लेखक व इतिहासकार अशोक कुमार पांडेय (दिल्ली) हे या व्याख्यानमालेचे उद्घाटन करून ‘गांधी, नेहरू आणि आंबेडकरांचा भारत’ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी अर्थ राज्यमंत्री अनिल पटेल हे असतील. शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रख्यात राजकीय विश्लेषक व विचारवंत डॉ. प्रकाश पवार (कोल्हापूर) हे ‘छत्रपती शिवाजी महाराज: परिवर्तनाचे कार्य आणि अन्वयार्थ’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा परभणीचे माजी खासदार गणेशराव दुधगावकर हे असतील. शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी दैनिक लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर (मुंबई) हे ‘लोकशाही विचार स्वातंत्र्य व प्रसारमाध्यमे’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत. अध्यक्षस्थान मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस व मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे भूषविणार आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण आणि देवगिरी महाविद्यालय विकास समितीचे जेष्ठ सदस्य पंडितराव हर्षे यांचे मार्गदर्शन व पाठपुराव्याने ही व्याख्यानमाला यशस्वीपणे सुरु आहे.
या व्याख्यानमालेतून समाज प्रबोधनासाठी महाविद्यालयाने हेतूपूर्वक पुरोगामी विचाराचा ज्ञानयज्ञ गेल्या ३२ वर्षापासून सातत्याने या विचारपीठावरून तेवत ठेवला आहे. आतापर्यंत पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार, प्राचार्य डॉ. ना. य. डोळे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. बाबा आढाव, खा. जनार्दन वाघमारे, प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर, विश्वास पाटील, मेधा पाटकर, खा. सीताराम येचुरी, डॉ. जयसिंगराव पवार, शिवाजी सावंत, खा. कुमार केतकर, डॉ. भा. ल. भोळे, डॉ. यु. म. पठाण, अॅड. प्रकाश आंबेडकर, प्रा. पुष्पा भावे, न्या. बी. एन. देशमुख, डॉ. अरुण निगवेकर, रावसाहेब कसबे, डॉ. संदानंद मोरे, डॉ. सुहास पळशीकर, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अभय बंग, अॅड. उज्ज्वल निकम, उल्हास पवार, उत्तम कांबळे, तुषार गांधी, निखील वागळे, सुरेश द्वादशीवार, वृंदा करात अशा अनेक विचारवंत, लेखक, विधीज्ञ, पत्रकार,अर्थततज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत.
देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात दिनांक ८,९ व १० फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता ही व्याख्याने संपन्न होणार असून शहरातील साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच सामाजिक व राजकीय चळवळीतील सर्व नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा. असे आवाहन देवगिरी महाविद्यालय विकास समितीचे जेष्ठ सदस्य पंडितराव हर्षे, व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, समन्वयक डॉ. गणेश मोहिते, उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार, डॉ. अनिल आर्दड, डॉ. अपर्णा तावरे, प्रा. नंदकुमार गायकवाड, प्रा. सुरेश लिपाने, प्रा. विजय नलावडे व संयोजन समितीने केले आहे.