शिवाजी विद्यापीठात स्कूल व कॉलेज कनेक्ट फेज टू उपक्रमा-अंतर्गत ‘ओपन डे’ चे आयोजन
कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उच्च व तंत्रज्ञान अधिविभागामार्फत निर्देशीत केलेल्या स्कुल व कॉलेज कनेक्ट फेज 2 अंतर्गत “ओपन डे” चे आयोजन करण्यात आले आहे. स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी हा अधिविभाग सुरुवातीपासूनच नवनवीन विज्ञान प्रकल्प आणि उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. आपल्या विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील तसेच जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरीलही विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी आणि विज्ञानाची गोडी असणाऱ्या जनसामान्यांसाठीही वेळोवेळी विज्ञान-प्रसार व त्यावर आधारित उपक्रम राबविले जात असतात.
याच धरतीवर ‘ओपन डे’ या विज्ञानपूरक उपक्रमाचे आयोजन दिनांक ०२ व ०३ मे रोजी स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीमध्ये करण्यात आले असून त्यामध्ये दिनांक ०२ मे रोजी वैज्ञानिक पोस्टर कॉम्पिटिशन आणि ०३ मे रोजी वैज्ञानिक मॉडेल कॉम्पिटिशन असणार आहे. ही स्पर्धा दोन गटात होणार असून इयत्ता बारावी सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांचा एक गट व कोणत्याही विज्ञान विषयाच्या पदवी शाखेतील विद्यार्थ्यांचा दुसरा गट असणार आहे. तसेच या दोनही दिवशी नॅनोसायन्स आणि नॅनोतंत्रज्ञानावर आधारित विज्ञान-प्रदर्शनही, सर्वांसाठी खुले असणार आहे. या स्पर्धांचे परीक्षक म्हणुन भाभा अनुसंधान संशोधन केंद्र, मुंबई येथील शास्त्रज्ञ डॉ नंदिता मयती आणि डॉ नीलोत्पल बरूआ हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेनंतर दोन दिवस अनूक्रमे या दोनही शास्त्रज्ञांची व्याख्याने होणार असून त्याचा लाभ स्पर्धक विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक व विज्ञानरसिकांसाठी उपयुक्त असणार आहे. दिनांक ०३ मे रोजी विज्ञान प्रदर्शन व विविध वैज्ञानिक प्रकल्पांच्या सादरीकरणांनंतर या ‘ओपन डे’ ची सांगता होणार असून यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, पालकांनी व विज्ञानात रुची ठेवणाऱ्या प्रत्येक सामान्यांनीही या ओपन डे प्रोग्राम चा लाभ घ्यावा असे आवाहन, स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागाचे संचालक प्रा डॉ किरणकुमार शर्मा यांनी केले आहे.