अमरावती विद्यापीठात शिक्षकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
नवीन शैक्षणिक धोरणानुसार सत्र २०२४-२५ मध्ये नवीन अभ्यासक्रम लागू करण्याकरीता कार्यशाळेचे आयोजन
विद्यापीठ क्षेत्रातील चारही विद्याशाखेतील शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
अमरावती : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमाकरीता २०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठाव्दारे नवीन अभ्यासक्रम लागू केल्या जाणार आहे. हा अभ्यासक्रम लागू करण्याकरीता त्याची संपूर्ण माहिती शिक्षकांना मिळावी यासाठी प्रशिक्षण देण्याकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठासह पाचही जिल्ह्रातील संलग्नित महाविद्यालयांमध्ये एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठातील दृकश्राव्य सभागृहामध्ये येत्या १६ जुलै रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:३० दरम्यान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्रातील महाविद्यालयांसाठी आर एल टी सायन्स कॉलेज, अकोला, बुलडाणा जिल्ह्रांतील महाविद्यालयांसाठी जी एस विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव येथे दि १८ जुलै रोजी सकाळी १०:०० ते ०५:३० आणि यवतमाळ जिल्ह्रातील महाविद्यालयांसाठी अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ व वाशिम जिल्ह्रांतील महाविद्यालयांसाठी राजस्थान आर्यन कॉलेज, वाशिम येथे १९ जुलै रोजी सकाळी १०:०० ते ०५:३० या दरम्यान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व संबंधित महाविद्यालयांमधील प्रत्येक विद्याशाखेतील दोन शिक्षकांना वेळापत्रकानुसार आपापल्या जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यशाळेत नोंदणी करून सहभागी व्हायचे आहे. याबाबत विद्यापीठाच्या मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ मो अतिक यांनी पत्राव्दारे सर्व संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविले आहे. सर्व संबंधित शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यशाळेला प्रामुख्याने उपस्थित रहावे, आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमाकरीता नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती या प्रशिक्षण कार्यशाळेत जाणून घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले आहे.