कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात अनुवादशास्त्रावर आधारित एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या संस्कृत तथा संस्कृतेतर भाषा विभागाद्वारे सोमवार, दि २४ मार्च २०२५ रोजी एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. “भारतीय ज्ञान परंपरेच्या परिप्रेक्ष्यात अनुवादाभ्यास” या विषयावर आधारित या परिषदेला केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली द्वारे आर्थिक अनुदान प्राप्त झाले आहे.

अनुवादशास्त्र ही स्वतंत्र अध्ययनशाखा म्हणून विकसित झाली आहे. अनुवाद हे शास्त्र आणि कला यांचा समन्वय आहे. अन्य भाषेतील शास्त्रीय ग्रंथ, साहित्यकृती अनुवादित करताना अनुवादकाची कसोटी लागत असते. अनुवादित करावयाची कृती, अनुवादक आणि भाषाप्रभुत्व हे महत्त्वाचे असले तरी शास्त्रग्रंथ व साहित्यग्रंथांचे अनुवाद करताना येणा-या समस्या, आवश्यक भाषिक कौशल्ये इ विचार, विश्लेषण आणि समस्या यांवर साधकबाधक चर्चा या परिषदेत व्हावी या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषेच्या उद्घाटन समारोहाला प्रख्यात संस्कृत विद्वान्, कवी आणि साहित्यमर्मज्ञ केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या भोपाळ परिसराचे संचालक प्रो रमाकांत पांडेय प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारोहाचे अध्यक्षस्थान कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी भूषविणार आहेत. सारस्वत अतिथी या नात्याने विश्वविद्यालयाच्या पूर्व अधिष्ठाता प्रो नंदा पुरी आणि विशेष अतिथी या नात्याने संस्कृत महाकवी, विचक्षण विद्वान् प्रो मधुसूदन पेन्ना संचालक, संस्कृत अकादमी, हैद्राबाद उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभाला कुलसचिव डॉ देवानंद शुक्ल आणि रामटेक परिसर संचालक प्रो हरेकृष्ण अगस्ती विशेषत्वाने व्यासपीठावर उपस्थित राहतील. या परिषदेत संपूर्ण भारतातून संस्कृत प्राध्यापक, विद्वान् उपस्थित राहून शोधनिबंध सादर करणार आहेत. या परिषदेचे संयोजक संस्कृत तथा संस्कृतेतर भाषा संकायाच्या अधिष्ठाता प्रो कविता होले आणि संस्कृत भाषा व साहित्य विभाग प्रमुख प्रो पराग जोशी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे समन्वयक डॉ राजेंद्र जैन या परिषदेच्या यशस्वितेसाठी कार्यरत आहेत.