शिवाजी विद्यापीठामध्ये २३ व २४ फेब्रुवारी रोजी संख्याशास्त्र परिसंवादाचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामधील संख्याशास्त्र अधिविभागामध्ये दिनांक २३ व २४ फेब्रुवारी रोजी ‘वास्तविक समस्यांचे सांख्यिकीय अन्वेषण’ या विषयावरील दोन दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे च्या संख्याशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल गोरे, मेट्रिक कन्सल्टंसी लिमिटेड, पुणे चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. आनंद करंदीकर, व सेवानिवृत्त संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. एन. रटिहळ्ळी या सन्माननीय अतिथिंच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती विभागप्रमुख प्रा. डॉ. शशीभूषण महाडिक यांनी दिली.
परिसंवादाच्या पहिल्या दिवशी, पहिल्या सत्रामध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांतील संख्याशास्त्राचे शिक्षक उपस्थित राहणार असून यामध्ये संख्याशास्त्र विषयाच्या अध्यापनामध्ये येणाऱ्या अडचणी, नाविन्यता व उपाययोजना, तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार झालेल्या बदलाला सामोरे जाताना शिक्षकांना अध्यापनामध्ये करावे लागणारे बदल यावर चर्चा होणार आहे. दुसऱ्या सत्रात ‘समस्या तुमची, उत्तर आमचे’ हा अभिनव उपक्रम होणार असून या उपक्रमांतर्गत कृषी,उद्योग, व्यवसाय, आरोग्य सेवा,व्यापार, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, संशोधन संस्था आदी क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना तसेच संशोधकांना त्यांच्या क्षेत्रातील समस्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने आवश्यक संख्याशास्त्रीय सल्ला तज्ञांकडून मोफत दिला जाणार आहे. इच्छुकांना त्यांच्या समस्येविषयीची माहिती देण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून संख्याशास्त्राचा वापर करून विविध क्षेत्रातील सोडविण्यात आलेल्या प्रश्नांबाबतीतील केस स्टडीचे सादरीकरण होणार आहे. तसेच याच दिवशी संख्याशास्त्र अधिविभाग आणि शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटना (सुस्टा) यांच्या संयुक्त विद्यमाने बी. एस्सी. व एम. एस्सी. च्या विद्यार्थ्यांसाठी संख्याशास्त्रीय प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी बी.एस्सी. मधून १६ तर एम.एस्सी. मधून ९ संघांनी सहभाग नोंदवला आहे. परिसंवादामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील ३५० विद्यार्थी व ६० शिक्षक सहभागी होणार आहेत.