मुक्त विद्यापीठात ‘योग दर्शन 2024’ या राष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन
नाशिक : योग संशोधन क्षेत्रात चालना मिळण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने योग परिषदेचे आयोजन करण्यास कोविड काळापासून सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून योग संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन लेख प्रकाशित करणे तसेच चांगल्या वक्त्यांचे योग विषयक विचार आणि मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीने ‘योग दर्शन 2024’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि २३ – २४ ऑगस्ट 2024 रोजीकरण्यात आले आहे.
सदर परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, दि 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीमधील सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्र सिंह बिसेन, आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ जयदीप निकम, कुलसचिव दिलीप भरड यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान योग पुरस्कार प्राप्त योगाचार्य डॉ विश्वासराव मंडलिक, लोणावळा योग संस्थेचे डॉ मन्मथ घरोटे, जळगाव येथील डॉ विजय कांची, एस व्यासा विद्यापीठाचे डॉ श्रीनिवास यांची उपस्थिती व बहुमोल मार्गदर्शन या प्रसंगी मिळणार आहे. या परिषदेमध्ये भारतभरातून सुमारे १५० योग साधक व अभ्यासक प्रत्यक्ष, तसेच आभासी पद्धतीने सहभागी होऊन पेपर सादरीकरण करणार आहेत.
दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून , राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था (एनआयईपीए), नवी दिल्ली ह्या उपस्थीत राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त योग अभ्यासकांनी उपस्थीत रहावे, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक तथा परिषदेचे आयोजक डॉ जयदीप निकम यांनी दिली.