विवेकानंद महाविद्यालयात ‘मराठी समीक्षेचे वर्तमान’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
ज्येष्ठ समीक्षक प्रभाकर बागले यांच्या सन्मानार्थ २१ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजन
छत्रपती संभाजीनगर : सह्याद्री प्रतिष्ठान आणि विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठीतील ज्येष्ठ समीक्षक आणि ‘अनुष्टुभ’ या नियतकालिकाचे माजी संपादक, प्राचार्य प्रभाकर बागले यांच्या सन्मानार्थ छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयात दि 21 सप्टेंबर 2024 रोजी ‘मराठी समीक्षेचे वर्तमान’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य बागले यांनी नुकतीच वयाची पंचाऐंशी वर्ष पूर्ण केली असून ते दीर्घकाळापासून समीक्षालेखन करत आहेत.
त्यांच्या एकूणच साहित्यिक कार्याचा गौरव करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विवेकानंद महाविद्यालयात सकाळी अकरा वाजता या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक डॉ दिलीप धोंडगे (नाशिक) यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि समीक्षक डॉ रमेश वरखेडे (नाशिक) हे बीजभाषण करणार आहेत. विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दादाराव शेंगुळे या सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील तर प्रसिद्ध कवी आणि समीक्षक डॉ पी विठ्ठल (नांदेड) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दुपारी साडेबारा वाजता ‘मराठी समीक्षा आणि संशोधन : नवे दृष्टिकोन’ या विषयावर दुसरे सत्र होणार असून डॉ सतीश बडवे (छत्रपती संभाजीनगर) हे या सत्राचे अध्यक्ष असतील. तर ‘स्त्रीवादी समीक्षा आणि संशोधनपद्धती’ या विषयावर ज्येष्ठ साहित्य अभ्यासक डॉ मंगला वरखेडे (नाशिक) बोलणार आहेत. या सत्रात कविता-रतीचे संपादक डॉ आशुतोष पाटील (धुळे) हे ‘मराठी काव्य समीक्षेचे वर्तमान’ या विषयावर आपली मांडणी करणार आहेत. ‘प्रभाकर बागले वाडमयीन कर्तृत्व’ या विषयावर डॉ एकनाथ पगार (देवळा) यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे सत्र होणार असून ‘प्राचार्य प्रभाकर बागले यांचे अनुष्टुभमधील लेखन’ या विषयावर डॉ प्रकाश शेवाळे (नाशिक ) आणि ‘प्रभाकर बागले यांचे समीक्षणात्मक लेखन’ या विषयावर डॉ अनिरुद्ध मोरे (छत्रपती संभाजीनगर) बोलणार आहेत.
सायंकाळी चार वाजता प्रा बाळासाहेब बोरसे उर्फ कवी मुकुल यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे संमेलन होणार असून या कविसंमेलनात रंजन कंधारकर, ललित अधाने, संतोष पद्माकर पवार, प्रिया धारूरकर, सुनील उबाळे, शशिकांत पाटील आणि लक्ष्मण खेडकर हे सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता प्राचार्य प्रभाकर बागले यांचा मराठीतील नामवंत समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध कवयित्री नीरजा (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती असेल.
तरी या चर्चासत्रास आणि सत्कार समारंभास साहित्य अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ कैलास अंभुरे, विवेकानंद महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ दत्तात्रय डुंबरे आणि अमृता प्रभाकर बागले यांनी केले आहे.