एमजीएम विद्यापीठात ‘विकास संवाद’वर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय आणि इंडियन कम्युनिकेशन कॉँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट’ या विषयावर रविवार, दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेसाठी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रीय परिषदेसाठी बीजभाषक म्हणून कर्नाटक राज्यातील कोपन विद्यापीठाचे कुलगुरू तथा इंडियन कम्युनिकेशन कॉँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रो बी के रवी उपस्थित राहणार आहेत. उत्कल विद्यापीठ, ओडिशाचे सेंटर फॉर मीडिया स्टडीजचे संचालक तथा इंडियन कम्युनिकेशन कॉँग्रेसचे सचिव प्रो उपेंद्र पाधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे माजी विभागप्रमुख प्रो व्ही एल धारूरकर, जेएनयू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या सहयोगी प्राध्यापक डॉ अर्चना कुमारी यांचे मार्गदर्शक लाभणार आहे.
या परिषदेमध्ये विकास संवादावर देशभरातून संशोधक आपले संशोधन पेपर सादर करणार आहेत. माध्यमे आणि राष्ट्रीय विकास, कृषिसंवाद, शाश्वत संवाद, पर्यावरणातील विकासात्मक बदल, महिलांचा सहभाग आणि विकास, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विकास, ग्रामीण आणि शहरी भागातील माध्यमांचा विकास, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि विकास संवाद, लोकमाध्यम आणि ग्रामीण संवाद, शाश्वत विकासाचे ध्येय आणि माध्यमे या विषयांवर चर्चा होणार आहे.
विनाशुल्क असलेल्या या परिषदेस जास्तीत जास्त संशोधकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन परिषदेच्या समन्वयक सामाजिक शास्त्रे व मानव्यविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, डॉ झरताब अंसारी व प्रा कविता सोनी यांनी केले आहे.