‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
नांदेड : महाराष्ट्र शासनाचे पुराभिलेख संचालनालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी ‘मोडी लिपी प्रचार व प्रसार’ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भाषा संकुलाच्या सभागृहात स. १०:०० वा. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमेश ढगे हे राहणार आहेत. मुंबई येथील विषयतज्ज्ञ मनोज राजपूत भूमिका कथन करणार आहेत. विविध सत्रांमध्ये अमोल महल्ले, पंकज पाटील, रोहित कोल्हे आणि गणेश खोडके हे मार्गदर्शन करणार आहेत. दु. २:०० वा. मानव्य विज्ञान विद्याशाखेच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलजा वाडीकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचा समारोप होणार आहे.

सदरील कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून, कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात आले नाही. कार्यशाळेमध्ये मोडीचे अक्षरवळण आणि बाराखडी, शब्द संक्षेप व्यवस्था, कागदपत्रांचे प्रकार, कालगणना, दप्तरखाने, जमीन मोजण्याची पद्धती, रेघी हिशेबाची समजुत अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी दिली. भाषा व सामाजिकशास्त्रे क्षेत्रातील संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यशाळेच्या संयोजकांनी केले आहे. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रवींद्र टाटू, पवन वडजे, दिगंबर सत्वधर, संजय आठवले, शिवराज वडजे, माधव अंभोरे, संध्या बेद्रे, अपर्णा काचकोंडे, पंजाब टापरे प्रयत्न करत आहेत.