महात्मा गांधी मिशन विद्यापीठात तृतीयपंथीयांना शिकण्याची संधी
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ कायमच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आले असून विद्यापीठाच्या वतीने आता तृतीयपंथीयांना उच्च शिक्षण आणि कौशल्य आधारित शिक्षण दिले जाणार आहे. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तृतीयपंथीय सामाजिक विकास संस्थेच्या शिष्टमंडळासमवेत नुकतीच एमजीएम विद्यापीठात बैठक संपन्न झाली. यावेळी, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई, डॉ.स्मिता अवचार, तृतीयपंथीय सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष अल्ताब शेख सीमा नायक, सुहाना शेख सीमा नायक, रेशमा एम इटके, निकिता सुहाना शेख, गायत्री शेख, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.लता जाधव व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, तृतीयपंथीयांसाठी एमजीएम विद्यापीठ खुले असून येथे त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात शिकण्याची आणि स्वत:च्या कौशल्याला वाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आजही विद्यापीठात काही विभागांमध्ये तृतीयपंथीय शिक्षण घेत आहेत. एमजीएम रुग्णालयात तृतीयपंथीयांची विशेष काळजी घेतली जात असून आवश्यकतेप्रमाणे याठिकाणी त्यांच्यासाठी स्वतंत्र राखीव खाटांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. विविध वयोगटातील तृतीयपंथीयांची आवड लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आवश्यकता असल्यास नवीन प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करता येऊ शकेल. सध्या या समुदायातील कोणत्या वयोगटातील व्यक्तींना शिक्षण, कौशल्य आणि नोकरीची गरज आहे; या बाबींचा विचार करीत विद्यापीठ स्तरावर निर्णय घेऊन त्याची अंमलबाजवणी करण्यात येईल. आज आलेल्या शिष्टमंडळासमवेत सकारात्मक चर्चा झाली असून काही दिवसांत त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार विद्यापीठात तृतीयपंथीयांना शिक्षण आणि कौशल्य शिकविण्यात येणार असल्याचे कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले, तृतीयपंथीय समूहातील ज्यांचे १० वी आणि १२ वीचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा व्यक्तींना विद्यापीठात शिक्षणाची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून स्वत: चा विकास साधत तृतीयपंथीय मुख्य प्रवाहात येऊ शकतात. विद्यापीठात पत्रकारिता, खादी, फॅशन डिझाईनिंग, कला, संगीत, फिल्म, फोटो, गायन अशा अनेकविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेऊन या क्षेत्रात तृतीयपंथीय नोकरी अथवा स्वत:चा व्यवसाय करू शकतील. या बैठकीत बैठकीत दैनंदिन आयुष्यात जगत असताना तृतीयपंथीय व्यक्तींना सार्वजनिक वाहतूक, रुग्णालय, शिक्षण, शौचालय, कायदा, पोलीसस्थानक, रिक्षा स्टँड, स्मशानभूमी, घरभाडे अशा विविध ठिकाणी येणाऱ्या समस्यांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.