डी वाय पाटील अभियांत्रीकीमध्ये काम करत अभियंता बनण्याची संधी
कोल्हापूर : डी वाय पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई), महाराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठाकडून वर्ष २०२४-२५ पासून नोकरी करणाऱ्यांसाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नोकरी करत करत अभियंता बनण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.
महाविद्यालयात पदवीसाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या दोन शाखांसाठी तर पदव्युत्तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग आणि इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन अभ्यासक्रमांकरिता प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
महाविद्यालयापासून ७५ किलोमीटर पर्यंतच्या अंतरामध्ये असलेल्या केंद्र अथवा राज्य सरकारकडे नोंदणीकृत असलेले उद्योग व संस्था, खाजगी किंवा सार्वजनिक कंपनीमध्ये व्यावसायिक / कार्यरत कर्मचारी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतात. यासाठी किमान एक वर्ष पूर्ण वेळ काम करत असल्याचा अनुभव आवश्यक राहील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
या वर्किग प्रोफेशनलसाठीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व परीक्षाही नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच असेल. हे वर्ग सामान्यतः संध्याकाळच्या वेळेत तसेच उद्योग, संस्थेच्या वेळेनुसार लवचिक सोयीस्कर वेळी होतील. महाराष्ट्र सरकारच्या सीईटी सेलद्वारे केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश होतील. यासाठी महाराष्ट्र शासनाचे आरक्षण धोरण लागू असेल, तरी अभियंता होऊ इच्छिणाऱ्या नोकरदार व्यवसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ एस डी चेडे, रजिस्टर डॉ एल व्ही मालदे, ऍडमिशन विभाग प्रमुख प्रा रवींद्र बेन्नी उपस्थित होते.