मुक्त विद्यापीठाच्या एम ए शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे सेट परीक्षेत घवघवीत यश
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विद्याशाखेत एम ए शिक्षणशास्त्र हा शिक्षणक्रम राबविण्यात येतो. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात अभ्यासकेंद्रे देण्यात आलेली आहेत. अध्ययनार्थींच्या स्वयं-अध्ययनासाठी स्वयं-अध्यापन साहित्य विकसित करण्यात आलेले असून अध्ययनार्थींना मानवी आणि शैक्षणिक आधार देण्याचे महत्त्वाचे कार्य अभ्यासकेंद्रामार्फत केले जाते. या शिक्षणक्रमात संशोधन व क्षेत्रीय कार्य अनिवार्य असल्यामुळे अध्ययनार्थींमध्ये संशोधन वृत्तीचा विकास होऊन त्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोजन करता येते.
या शिक्षणक्रमासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक तसेच प्रशासकीय अधिकारी प्रवेश घेतात. अभ्यासकेंद्रामार्फत संपर्कसत्राव्यतिरिक्त अध्ययनार्थींना सेट / नेट परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते.
याचाच एक परिपाक म्हणून दि 7 एप्रिल 2024 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे (युजीसी) सहाय्यक प्राध्यापकांसाठी सावित्रीफुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता चाचणी (M-SET) परीक्षेमध्ये मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे महाराष्ट्रातील विविध अभ्यासकेंद्रावरील एकूण 64 विद्यार्थ्यांनी ‘शिक्षणशास्त्र’ या विषयात घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र कुलगुरू प्रा जोगेंद्रसिंह बिसेन, संचालक शिक्षणशास्त्र विद्याशाखा तथा व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा संजीवनी महाले, कुलसचिव दिलीप भरड, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील आणि विद्यापीठातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांतर्फे सर्व सेट उत्तीर्ण झालेल्या अध्ययनार्थींच्या अभ्यासकेंद्राचे व अध्ययनार्थींचे अभिनंदन करण्यात आलेले आहे. सध्या एम ए शिक्षणशास्त्र या शिक्षणक्रमाचे प्रवेश सुरु असून ज्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे अशा इच्छुक अध्ययनार्थींनी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट देऊन प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रा संजीवनी महाले, संचालक शिक्षणशास्त्र विद्याशाखा यांनी केले आहे.