खुलताबादचे कोहिनूर महाविद्यालय अभ्यासकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा मुक्त विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रशासनातर्फे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या जानेवारी २०२५ मध्ये विद्यापीठाच्या हिवाळी अंतिम व पुरवणी परीक्षा संपन्न झाल्या झाल्या होत्या. या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभागीय केंद्रांतर्गत असलेल्या खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,खुलताबाद या परीक्षा केंद्रामध्ये दोन विद्यार्थ्यांनी एम ए हिंदी शिक्षणक्रमाच्या लेखी परीक्षेत त्याच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्याच हस्ताक्षरात उत्तरपत्रिका लिहून घेतल्या अशी तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे दाखल झाली होती.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन त्याची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने त्रिसदस्य समिती स्थापन केली होती. या समितीने सर्व बाबींची प्रत्यक्ष पडताळणी करून त्याचा अहवाल प्रशासनाच सादर केला. त्या अहवालाच्या शिफारशी नुसार कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खुलताबाद ता खुलताबाद जि छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्व शिक्षणक्रमाचे अभ्यासकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सदरील अभ्यासकेंद्रावरील प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार नजीकच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची मुभा विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.