एमजीएममध्ये एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न
समकालीन काळामध्ये समानतेचा विचार जपत वाटचाल करणे आवश्यक; एमजीएममधील कार्यशाळेत मान्यवरांचा सूर…
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखा अभ्यास विभागातील स्त्री व लिंगभाव अभ्यास विभागाच्या वतीने ‘केयरिंग अँड इन्क्लुसिव्ह सोसायटी – रि परसिव्हिंग जेंडर’ या विषयावर विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृहात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेत लिंगभाव प्रशिक्षक तसेच समुपदेशक सुरज पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला.


या कार्यशाळेच्या दरम्यान समुपदेशक सुरज पवार यांनी लिंग, लिंगभाव, पितृसत्ता, पुरुषत्व, समता आणि समानता अशा विविध विषयांवर चर्चा करीत खेळाच्या आणि लघुपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या संकल्पनांची ओळख करून दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ प्राप्ती देशमुख, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना समुपदेशक सुरज पवार म्हणाले, स्त्री व पुरुष यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समानता असून केवळ काही शारीरिक फरकाच्या आधारावर व काही धारणांमुळे लिंगभाव हा स्त्रीत्व आणि पुरुषत्व विकसित करण्याचे काम करतो. पितृसत्तेचा विचार मुळातच सत्ता निर्माण करणारा असून पितृसत्ता ही नात्यांमध्ये विविध प्रकारे काम करत असते.
स्त्री – पुरुषांचे एकूणच श्रम विभाजन कसे काम करते, यावर आपण सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण समकालीन काळातही असून ते दिवसेंदिवस वाढत आहे, ही बाब आपल्या सर्वांसाठी चिंतेची आहे. यासारख्या कार्यशाळा वारंवार होणे गरजेचे असून या माध्यमातून आपण समानतेचा विचार आपल्यात रुजविण्यास मदत होईल, असे अधिष्ठाता डॉ रेखा शेळके यांनी यावेळी सांगितले.
अधिष्ठाता डॉ प्राप्ती देशमुख यावेळी बोलताना म्हणाल्या, समकालीन काळामध्ये जगत असताना आपल्या सर्वांमध्ये संवेदनशीलता असणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनातून लिंगभावाची सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण होत असते. समाजाच्या विविध भागात मातृसत्ता व पितृसत्ता कशी काम करते याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येते की, संबंधित समाजाची मानसिकता कशी तयार होत असते.
एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याने एक आदर्श समाज निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे विकसित समाजाच्या प्रक्रियेमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग हा अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई यांनी यावेळी सांगितले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई यांनी केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ मंजुश्री लांडगे यांनी केले तर आभार डॉ भागवत वाघ यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय प्रा अनिता फुलवाडे यांनी करून दिला. सदरील कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी निलेश बेडके, प्रा करुणा घोडकी व डॉ अमरदीप आसोलकर यांनी परिश्रम घेतले.–