अमरावती विद्यापीठात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी – प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे
अमरावती : नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी स्तरावर नवीन अभ्यासक्रम २०२४-२५ पासून लागू करावयाचे असून त्याकरीता शिक्षकांना प्रशिक्षण देण्याकरीता कार्यशाळा महत्वाची ठऱणार असून शिक्षकांनी नवीन अभ्यासक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. या धोरणाची माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमाकरीता २०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठाव्दारे नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.
हा अभ्यासक्रम लागू करण्याकरीता त्याची संपूर्ण माहिती शिक्षकांना मिळावी, यासाठी प्रशिक्षण देण्याकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठासह पाचही जिल्ह्रातील संलग्नित महाविद्यालयांमध्ये एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठातील दृकश्राव्य सभागृहामध्ये अमरावती जिल्ह्राकरीता १६ जुलै, २०२४ रोजी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना बोलत होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विद्यापीठातील मानवविद्याशाखेच्या अधिष्ठाता तथा मराठी विभागप्रमुख डॉ मोना चिमोटे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ संजय डुडुल, आंतरिवद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ वैशाली गुडधे, ब्राजलाल बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिपक धोटे, मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ मो अतिक यांची उपस्थिती होती.
डॉ ढोरे पुढे म्हणाले, ३४ वर्षानंतर १९८६ नंतर नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला मिळाले आहे. २०२३-२४ पासून शैक्षणिक धोरणाची पदव्युत्तर व स्वायत्त महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी करण्यात आली. यावर्षीपासून पदवी स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. अभ्यास मंडळांनी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
शिक्षकांचे यामधून सर्व शंकांचे निरसन होणार आहे. चारही विद्याशाखेंतर्गत ही प्रशिक्षण कार्यशाळा पाचही जिल्ह्रातील शिक्षकांसाठी होत असल्यामुळे नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सुलभ होणार आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा सर्वांनी लाभ घेऊन पदवी स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम लागू करण्यासाठी परिश्रम घ्यावेत. या माध्यमातून विद्यार्थी, पालकांपर्यंत याची माहिती सर्व शिक्षकांनी पोहचवावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
मान्यवरांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
या कार्यशाळेत विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ संजय डुडुल व ब्राजलाल बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिपक धोटे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या रेडीनेस फॉर इम्प्लिमेंटेशन यावर सखोल मार्गदर्शन केले. तर विद्यापीठातील मानवविद्या शाखेच्या अधिष्ठाता तथा मराठी विभागप्रमुख डॉ मोना चिमोटे व डॉ अण्णा वैद्य यांनी मार्गदर्शन करतांना पदवी पातळीवर नवीन शैक्षणिक धोरण राबविणे बंधनकारक असल्याचे सांगून नवीन शैक्षणिक धोरण शिक्षक, विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहचविण्यास या कार्यशाळेचा उपयोग होणार असल्याचे सांगितले. राष्ट्रविकासात शिक्षकांची महत्वाची भूमिका असल्याचेही त्या म्हणाल्या.
वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ डी डब्ल्यू निचित व डॉ अरुणा वाडेकर यांनी व नंतरच्या सत्रात आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ वैशाली गुडधे, डॉ तनुजा राऊत व डॉ वैशाली धनविजाय यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठ गीताने उद्घाटन सत्र सुरू झाले.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ संजय डुडुल यांनी, तर आभार विद्यापीठाच्या मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ मो अतिक यांनी मानले. कार्यशाळेला ननसा चे संचालक डॉ अजय लाड, तसेच अमरावती शहरासह जिल्ह्रातील महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.