डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विशेष एकांकिका महोत्सवात चार एकांकिका सादर
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कला सादरीकरण विभागाच्या ४९ व्या एकांकिका महोत्सवात चार दिवसात एकुण १३ एकांकिका सादर होणार असून दुसऱ्या दिवशी चार एकांकिका सादर झाल्या.
सुरूवातीला संदीप पाटील लिखीत व साधना विठोरे दिग्दर्शीत ‘फुलन” ही एकांकिका सादर झाली. फुलन ही एका मुलीची गोष्ट आहे. त्याचबरोबर ती व्यवस्थेची गोष्ट आहे. व्यवस्था सत्य लपवून ठेवण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकते हे यातून सांगितलं आहे. यामधे एक मुलगी जी एका गुन्ह्याची साक्षीदार आहे. तिलाच त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो यावर भाष्य आहे.
यानंतर दुसरी एकांकिका प्रा डॉ दासू वैद्य लिखीत व गणेश शिर्के दिग्दर्शीत ‘देता आधार की करू अंधार” सादर झाली. जो पर्यंत आपण आपल्या माणसाला आधार देत नाहीत तो पर्यन्त आपल्याला कोणीच आधार देणार नाही या गाव व शहर या द्वंदात फसलेल्या कलाकारांच्या समस्यांवर भाश्य करणारी व शेवटी सकारात्मकता दर्शवणारी एकांकिका सादर झाली.
मंटोच्या कथेवर आधारीत अख्तर अली लिखीत व सय्यद एजास दिग्दर्शीत तिसरी एकांकिका “बादशाहत का खात्मा” ही हिंदी एकांकिका सादर झाली. एका संवेदनशील लेखकाला फोन संभाषण द्वारे अनोळख्या स्त्रीशी झालेले प्रेम आणि फोन संभाषणाच्या अतिरेकातून त्याचा झालेला करुण अंत यावर एकांकिकेत भाष्य करण्यात आले.
अरविंद जगताप लिखित व रसिका भात खेडेकर दिग्दर्शित “झाल्या तिन्ही सांजा” ही चौथी एकांकिका सादर झाली. प्रेम, लग्न, ग्रामीण व शहरी भाग यांतील अंतर, संघर्ष , सुख-दुःख यावर भाष्य करणारी ही एकांकिका होती.
कला सादरीकरण विभागाच्या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठीचा परीक्षेचा भाग असलेला हा एकांकिका महोत्सव असतो हे विशेष.
यावेळी विभाग प्रमुख डॉ वैशाली बोदेले, प्रा स्मिता साबळे, प्रा गजानन दांडगे, डॉ सुनील टाक, डॉ रामदास ठोके यांच्यासह विभागातील सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, आजी- माजी विद्यार्थी व कर्मचारी व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.