शताब्दी पर्व निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात खंजेरी भजन स्पर्धा संपन्न
अभंग देखील कौशल्यच – डॉ. विकास महात्मे
नागपूर : (21-11-2023) अभंग देखील कौशल्यच असल्याचे प्रतिपादन माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी पर्व निमित्त भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन सावनेर तालुक्यातील दहेगाव (रंगारी) येथे शनिवार, दिनांक १८ व रविवार १९ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र व दहेगाव (रंगारी) येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन करताना डॉ. महात्मे बोलत होते.
खंजेरी भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी येथील सरचिटणीस श्री. जनार्दनपंत बोथे, विद्यापीठ मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, माजी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे, शताब्दी महोत्सव कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष कसबेकर, श्री. ज्ञानेश्वरदादा रक्षक, विद्यापीठ रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे, पुंडलिकराव चौधरी यांची विशेष उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खंजेरी भजनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले. अभंग हे रंजक शिक्षण आहे. रंजक शिक्षणातून उद्बोधन मनात रुजते. अभंगातून होत असलेले उद्बोधन मनात रुजविण्याचे काम राष्ट्रसंतांनी केले असल्याचे पद्मश्री डॉ. महात्मे यांनी पुढे बोलताना सांगितले. एकदा शिकलेले मनात रुजत नाही. मात्र, वारंवार सराव केल्याने कोणताही विषय आत्मसात होतो. अभंग, भजनाच्या माध्यमातून वारंवार सराव होत असल्याने ते मनात रुजून त्यातून सामाजिक बदल होतो. संतच हे सामाजिक बदल करू शकतात, असे डॉ. महात्मे म्हणाले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना डॉ. महात्मे शुभेच्छा दिल्या.
ग्रामविकासासाठी विद्यापीठ ग्रामस्थांसोबत – डॉ. चौधरी
ग्रामविकासासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे ग्रामस्थांसोबत आहे, असे प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विद्यापीठाकडून विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये ‘ग्राम चलो अभियान’ (रिचिंग टू अनरीच्ड) यातून गावातील समस्या जाणून घेत शेती, स्वयंरोजगार यासह यामध्ये कोण कोणत्या सुविधा पोहोचवता येतील या दृष्टीने विद्यापीठाने कार्य सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ गावाशी जुळावे म्हणून मंडईच्या माध्यमातून गावागावात पोहोचत आहे. स्थानिक नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून गावांमध्ये रोजगार उपलब्ध व्हावे या दृष्टीने विद्यापीठाने कार्य सुरू केले आहे. भंडारा जिल्ह्यात सिल्क क्लस्टर, मधाचे क्लस्टर उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे कुलगुरू म्हणाले. युवकांना रोजगार उभा करण्यास तसेच उत्पादनाच्या विक्रीसाठी देखील विद्यापीठ मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबाबत दहेगाव (रंगारी) येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कुलगुरूंनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावामधून दिंडी व रामधून फेरी काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. संचालन विद्यार्थी स्नेहल वाघमारे यांनी केले तर आभार अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांनी मानले.