मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात व्याख्यानमालेचे आयोजन
२९ फेब्रुवारीला संदेश भंडारे यांचे, तर १ मार्चला प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांचे व्याख्यान
अमरावती : कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ( दि.२७ फेब्रुवारी ) महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, विदर्भ साहित्य संघ, शाखा अमरावती, पदव्युत्तर मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘वारी’ आणि तमाशा ‘ या विषयांवरील छायाचित्रांसाठी ख्यातनाम असलेले कलावंत छायाचित्रकार आणि अभ्यासक संदेश भंडारे ( पुणे ) हे
‘तमाशा आणि वारी : छायाचित्र दर्शन आणि संवाद’ या विषयावर गुंफणार आहेत. दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजता विद्यापीठाच्या डॉ. पंजाबराव देशमुख अधिसभा सभागृहात हे व्याख्यान होईल. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मिलिंद बारहाते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ,अमळनेर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे ( नागपूर ) हे ‘मराठी साहित्य : समकालीन वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावर गुंफणार आहेत. मराठी साहित्याच्या क्षेत्रात डॉ. शोभणे यांना कादंबरीकार, कथाकार ,समीक्षक आणि संपादक म्हणून मोठी मान्यता आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. पंजाबराव देशमुख अधिसभा सभागृहात दि. १ मार्च २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता तथा मराठी विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावतीचे अध्यक्ष विलास मराठे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहील.
दोन्ही व्याख्यानांचा सर्व भाषा व साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा आणि मायमराठीच्या या जागरात सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख आणि मराठी विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे यांनी केले आहे.