‘स्वारातीम’ विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी प्रथम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त कुलगुरूंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कुलगुरू म्हणाले की, हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व केलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे नावाने स्थापन झालेल्या या विद्यापीठाने सांस्कृतिक, क्रीडा व संशोधनाच्या क्षेत्रात देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून स्थापन झालेल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला. सामुहिक प्रयत्नातूनच विकास होत असतो. पायाभूत सुविधा महत्वाच्या असतात पण त्याहून अधिक शैक्षणिक आणि संशोधनावर भर दिला पाहिजे, विद्यार्थ्यांना काळानुसार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यापीठ हे सर्वार्थाने पुढे नेण्यासाठी सहकार्य आणि प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा डॉ शशिकांत ढवळे व रामेश्वर एम आरदड यांनी लिखित केलेल्या ‘फार्मासुटिकल ऑरगॉनिक केमिस्ट्री-I’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, अधिष्ठाता डॉ एम के पाटील, डॉ डी एम खंदारे, डॉ पराग खडके, वित्त व लेखाधिकारी महमद शकील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सुर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा विभागाचे संचालक डॉ मनोज रेड्डी, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ विनायक जाधव, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ जगदिश कुलकर्णी यांच्या समवेत विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ राजेंद्र गोणारकर यांनी केले.