शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात होणार ऑरेंज ऑलिम्पिक
नागपूर २१-१०-२०२३ :ऑरेंज ऑलिम्पिक टीम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ऑरेंज ऑलिम्पिक स्पर्धा- २०२३ चे आयोजन २३ ते २८ नोव्हेंबर दरम्यान नागपुरात करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यंदा आपले शताब्दी महोत्सव साजरे करीत आहे. याच महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचे आयोजन ऑरेंज ऑलिम्पिक टीमच्या वतीने करण्यात आल्याची माहिती नागपूर विद्यापीठ क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी दिली.
या शालेय स्पर्धेत टेबलटेनिस, बॅडमिंटन आणि अॅथलेटिक्स या खेळाचा समावेश राहणार आहे. नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटना, नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटना तसेच नागपूर जिल्हा टेबलटेनिस संघटनेच्या मार्गदर्शनात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धा नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर होणार आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ ही प्रवेश नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे.स्थानिक स्तरावरचा हा महत्वाचा व सर्वात मोठा इव्हेंट राहणार आहे. शहरातील क्रीडा प्रतिभेला वाव देणाऱ्या शाळा यात सहभागी होणार आहे. तळागाळातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे तसेच क्रीडा भावना जागृत व्हावी हाच ऑरेंज ऑलिम्पिकचे ध्येय असल्याचे मत ऑरेंज ऑलिम्पिकच्या संस्थापक व योग प्रशिक्षक दिव्या चावला आणि माजी रणजीपटू केतन कावरे यांनी व्यक्त केले.
सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र तर विजेत्या खेळाडूंना पदक देउन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट शाळांनाही चषक देउन सन्मानित करण्यात येणार आहे. नागपूरातील ५० हून अधिक शाळांमधून सुमारे एक हजार विद्यार्थी यात सहभागी होतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. स्पर्धेच्या भव्य आयोजनासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मंगेश काशीकर यांच्या मार्गदर्शनात बॅडमिंटन खेळाचे तर अॅड. आशुतोष पोतनीस यांच्या नेतृत्वात टेबल टेनिसचे आणि जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष गुरुदेव नगराळे यांच्या मार्गदर्शनात अॅथलेटिक्स खेळाचे नियोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दिव्या चावला आणि केतन कावरे यांच्याशी ७८२१०- ७६८४० या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वयोगटाचा राहणार समावेश
टेबल टेनिस (१३, १५, १७, १९ वर्षांखालील मुले-मुली- एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी.)
बॅडमिंटन (१३, १५, १७, १९ वर्षांखालील मुले-मुली-एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी.)
अॅथलेटिक्स ( १२, १४, १६, १८ वर्षांखालील मुले-मुली- ट्रॅक इव्हेंट्स – १००, २००, ४००, ८००, १५००, ४ बाय १०० मीटर रिले.)