‘बामु’त अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त डॉ सुरेश चौथाईवाले यांचे व्याख्यान संपन्न
लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वास्तविक जीवनाचा वेध घेणारे – डॉ सुरेश चौथाईवाले
छत्रपती संभाजीनगर : लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांनी, आपल्या साहित्यातून कलेच्या प्रत्येक बाजूला न्याय दिला. त्यांचे लोकनाट्य सामाजिक प्रबोधनाचे भान ठेवणारे आणि समाजमनाची जाण ठेवणारे आहे.त्यांनी आपल्या साहित्यातून वैजयंता, चित्रा, आवडी सारख्या सशक्त नायिका उभ्या केल्या, ज्या परिस्थिती ला कधीहि शरण गेल्या नाहीत, उलट प्रस्थापित समाज व्यवस्थेवर बंड पुकारून, त्यांच्या नायक नायिका सदैव सकारात्मक पद्धतीने पुढे आलेत, नकारात्मक भावनेतून त्यांनी कधीही माघार घेतली नाही. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने सर्वप्रथम वंचित, शोषित समाजाच्या व्यथा,वेदना, मांडण्याचे महत्वपूर्ण कार्य केले,असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत प्रा डॉ सुरेश चौथाईवाले यांनी केले.
नाट्यशास्त्र विभागाच्या कला सादरीकरण संकुल मध्ये गुरुवारी १ ऑगस्ट २०२४ रोजी, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त लोकशाहिर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने आयोजित, “अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील सामाजिक जाणिवा” या विषयावर डॉ सुरेश चौथाईवाले बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून , वंचितांचा आवाज म्हणून ते पुढे आले.समाजातील जातीय व्यवस्था आणि आधुनिक भारतीय समाजातील वर्गव्यवस्था यामध्ये तळागाळातील माणसांच्या जीवनाचे सत्य चित्रण खऱ्या अर्थाने, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातुन प्रकट होते. असे विचार त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहिर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या संचालिका, डॉ वैशाली बोदेले म्हणाल्या, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांनी, महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत, पारंपारिक तमाशाला लोकनाट्याचे स्वरूप देऊन, प्रबोधनाचा खरा अर्थ त्यांच्या कलेतून त्यांनी सार्थ केला.साहित्याच्या शेतात त्यांनी संघर्षवादी, प्रेरणावादी नायक नायिकांची पेरणी त्यांनी केली.त्यांचे साहित्य सामान्य माणसाला नायक व्हा! असे आवाहन करतात.
कार्यक्रमाचे आभार कला सादरीकरण विभागाच्या प्रमुख प्रा स्मिता साबळे यांनी केले. सूत्र संचालन प्रा विशाखा शिरवाडकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रदिप कांबळे यांनी केला. यावेळी ऍड बाबा सरदार, धनराज गोंडाणे, माधव सोनटक्के, प्रा गजानन दांडगे, डॉ प्रविणा पवार, डॉ गौरी कल्लावर, डॉ संजय पाईकराव, डॉ सागर चक्रनारायण, डॉ संजय सांगवीकर, डॉ रामदास ठोके, डॉ सुनील टाक, उत्तम सुरे, मोहन घोरपडे, नितीन ससाणे, योगेश गच्चे, सचिन ससाणे, आकाश गवळी, प्रा विकास गवई यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच शहरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.