भारती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी विज्ञान परिषदेचे उद्घाटन
आरोग्य व्यवस्थेतील बदलांसाठी होमिओपॅथी उपयुक्त – डॉ विजय भटकर
पुणे : आज उपलब्ध उपचार पद्धती पैकी होमिओपॅथी उपचार पद्धती जुन्या दीर्घकालीन आजारांवर जास्त परिणामकारक ठरताना दिसते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील बदलांसाठी होमिओपॅथी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ विजय भटकर यांनी केले. भारती विद्यापीठ होमिओपॅथिक महाविद्यालय व ग्लोबल होमिओपॅथी फाउंडेशन आणि विज्ञान भारती तर्फे आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी विज्ञान परिषदेचे उद्घाटन भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या धनकवडी येथील सभागृहात डॉ भटकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ग्लोबल होमिओपॅथी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ जयेश सिंघवी, ग्लोबल फाउंडेशनचे माजी अध्यक्ष डॉ ईश्वर दास, डॉ प्रविणकुमार, कुलगुरू डॉ विवेक सावजी, प्रभारी प्राचार्य डॉ अविनाश म्हेत्रे, अधिष्ठाता डॉ अनिता पाटील, डॉ एस प्रवीण कुमार ,डॉ ए कंनन, वलस मेनन उपस्थित होते. या परिषदेमध्ये होमिओपॅथीमधील नवीन संशोधन, कृषी आणि पशुचिकित्सा तसेच सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत होमिओपॅथीचा वापर याबाबत परिषदेत सखोल चर्चा झाली.
डॉ भटकर यांनी भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ पतंगराव कदम यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल गौरव उद्गार काढले. तसेच होमिओपॅथीला विशिष्ट दर्जा व उंचीवर नेण्यासाठी सखोल चिंतन व संशोधनाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ सावजी म्हणाले, आंतरविद्याशाखीय ज्ञानाची देवाण घेवाण करणे तसेच नवीन वैद्यकीय शिक्षण आत्मसात करणे यागोष्टी होमिओपॅथी डॉक्टरांना काळासोबत राहण्यासाठी आवश्यक ठरणार आहेत.
डॉ अनिल हब्बू, डॉ एम पी आर्य, डॉ अमरसिंह निकम, डॉ संजीव डोळे यांचा सन्मान करण्यात आला. या परिषदेत एकूण ५२ शोधनिबंध सादर करण्यात आले होते. मलेशिया विद्यापीठासह परदेशी व्याख्यात्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता तसेच २१ महाविद्यालाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, ५२५ प्रतिनिधी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक डॉ अनिता पाटील यांनी केले तर डॉ प्रविणकुमार यांनी आभार मानले.